वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2021-22 या वर्षात अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार ठरला आहे. यापूर्वी चीन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. अमेरिका आणि भारत या देशांमधील मजबूत आर्थिक संबंध दर्शविणारी ही घडामोड आहे. आगामी वर्षांमध्ये अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार वाढविण्याचा कल कायम राहणार आहे. दोन्ही देश स्वतःचे आर्थिक संबंध अधिक मजबूत करत आहेत. भारत चीनच्या तुलनेत विश्वासू व्यापारी भागीदार असल्याचे अमेरिकेचे मानणे आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2021-22 मध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 119.42 अब्ज डॉलर्सचा राहिला आहे. 2020-21 मध्ये हा आकडा 80.51 अब्ज डॉलर्स इतका होता. अमेरिकेला होणारी निर्यात 2021-22 मध्ये वाढून 76.11 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. मागील आर्थिक वर्षात हा आकडा 51.62 अब्ज डॉलर्स होता. 2020-21 मधील सुमारे 29 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत आयात वाढून 43.31 अब्ज डॉलर्सवर गेली आहे.
चीनसोबतचा व्यापार
2021-22 दरम्यान चीनसोबतचा भारताचा द्विपक्षीय व्यापार 115.42 अब्ज डॉलर्स राहिला. 2020-21 मध्ये हा आकडा 86.4 अब्ज डॉलर्स होता. चीनला 2020-21 मध्ये 21.18 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती. मागील आर्थिक वर्षात हा आकडा 21.25 अब्ज डॉलर्स राहिला. तर 2021-22 मध्ये आयात सुमारे 65.21 अब्ज डॉलर्सवरून वाढत 94.16 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. 2021-22 मध्ये व्यापारी तूट वाढून 72.91 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. तत्पूर्वीच्या आर्थिक वर्षात 44 अब्ज डॉलर्स इतकी चीनसोबतची व्यापारी तूट राहिली होती.
अमेरिकेसोबतचा व्यापार नफ्याचा
भारताचा ट्रेड सरप्लस (व्यापारातील नफा) असणाऱया काही देशांमध्ये अमेरिकेचा समावेश आहे. 2021-22 मध्ये भारताचा अमेरिकेसोबतचा ट्रेड सरप्लस 32.8 अब्ज डॉलर्सचा होता. 2013-14 पासून 2017-18 पर्यंत आणि 2020-21 मध्येही भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार चीन होता. चीनपूर्वी संयुक्त अरब अमिरात हा सर्वात मोठा व्यापारी भागीदार हाहेता. 2021-22 मध्ये 72.9 अब्ज डॉलर्ससह संयुक्त अरब अमिरात भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिला. त्यानंतर सौदी अरेबिया (42.85 अब्ज डॉलर्स), इराक (34.33 अब्ज डॉलर्स) आणि सिंगापूरचे (30 अब्ज डॉलर्स) स्थान आहे.