ग्रामपंचायत सदस्य अल्केश कांदळकर यांचा इशारा
गारगोटी प्रतिनिधी
गारगोटीसाठी मंजूर जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे खो घालण्याच्या वृत्तीच्या निषेधार्थ प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अल्केश कांदळकर निवेदनाद्वारे यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गारगोटीच्या वाढत्या लोकसंख्येसाठी व गारगोटीकरांच्या आरोग्यासाठी शुद्ध व मुबलक पाणी मिळण्यासाठी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने दिनांक 3 / 3 / 2023 रोजी गारगोटी शहरासाठी 22 कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्याची प्रशासकीय मान्यता देखील 3/3/2023 रोजी ग्रामपंचायत प्राप्त झाली.
या प्रस्तावित योजनेसाठी जलशुद्धीकरण केंद्राची आवश्यकता आहे. आणि या जलशुद्धीकरण केंद्रासाठी सदर गट नंबर 235 चे 18 एकर क्षेत्र हे गारगोटी ग्रामपंचायत देखरेख खाली सरकार गायरान सरपंच ग्रा.प. गारगोटी असे नोंद होते. ती काही राजकीय दबावापोटी ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना व पूर्व नोटीस न देता महसूल खात्याच्या अनागोंदी आणि पक्षपाती कारवाईमुळे सरकार गायरान अशी चुकीची आणि बेकायदेशीर नोंद केल्याचे ग्राम पंचायत गारगोटीच्या लक्षात आल्यानंतर सदर क्षेत्र गारगोटी ग्रा.प. देखरेखीसाठी मिळावे यासाठी वेळोवेळी मा.तहसिलदार, उपविभागीय अधिकारी,जिल्हाधिकारी यांचेकडे रीतसर मागणी केली.
त्याबाबत केवळ सदरचे क्षेत्र हे ग्रामपंचायत गारगोटीचे महत्त्वकांक्षी जलजीवन मिशन या योजनेसाठी मिळू नये म्हणून सदरची योजना कार्यान्वित होऊ नये म्हणून राजकीय दबावापोटी प्रशासनाने विशेषतः महसूल विभागाने सदरची जमीन जलशुद्धीकरण प्रकल्पास मिळू नये यासाठी चालढकल केली असून सदरची योजना रद्द होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यास जिल्हाधिकारी कोल्हापूर, उपविभागीय अधिकारी आजरा / भुदरगड, व तहसीलदार भुदरगड, हे पूर्णतः जबाबदार असल्याने सदरची जलशुद्धीकरण प्रकल्प योजना व जलजीवन मिशन योजना या ठिकाणी होण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना वारंवार प्रत्यक्ष भेटून सदरच्या योजने कामी सदर 235 गट नंबरच्या जमीन क्षेत्र 18 एकर पैकी 20 गुंठे जमीन ही जलशुद्धीकरण प्रकल्पाला द्यावी असा प्रस्ताव देऊन व त्याचा वारंवार पाठपुरावा करूनही याबाबत जिल्हाधिकारी हे कोणताही निर्णय घेत नाहीत यामागे मोठा राजकीय दबाव असल्याचा आम्हाला संशय आहे.
महसूल प्रशासनाने प्रामाणिकपणाने मनावर घेतलेस कायद्याने प्राप्त असलेल्या अधिकाराने सदर हणबरवाडी गट नंबर 235 मधील 18 एकर क्षेत्रापैकी केवळ 20 गुंठे क्षेत्र गारगोटी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावे. तसे न केलेस समस्त गारगोटी करांच्या शुद्ध व मुबलक पाणी मिळण्याच्या अधिकारास खो घालण्याच्या प्रवृत्तीचा निषेध म्हणून मंगळवार दि. 11 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून तहसीलदार कार्यालय समोर हुतात्मा चौक गारगोटी या ठिकाणी मी प्राणांतिक उपोषणास बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.