Tarun Bharat

कोल्हापुरात ११ मजली इमारतींचा मार्ग मोकळा


कोल्हापूर-विनोद सावंत
महापालिका अग्निशमन दलाकडे अधुनिक यंत्रसामुग्री नसल्याने १५ मीटरवरील इमारतींमध्ये आपत्ती घडल्यास बचाव कार्य करण्यास मर्यादा येत होत्या. यामुळे महापालिका ११ मजल्यावरील इमारतींच्या बांधकामांना परवानगी देत नव्हती. यामुळेच बांधकाम व्यावसायिकाडून टर्न टेबल लॅडर खरेदीची मागणी जोर धरत होती. मनपानेही लॅडर खरेदीचा निर्णय घेतला. वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर तीन दिवसांत टर्न टेबल लॅडर मनपाच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होत आहे. यामुळे मुंबई, पुण्यानंतर आता कोल्हापुरातही ११ मजल्यावरील टोले जंग इमारती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे १५ मीटरवरील इमारतीत आपत्ती घडल्यास बचाव कार्य राबवता येत नव्हते. यामुळेच ११ मजल्यावरील इमारतींना महापालिकेकडून रितसर परवानगी दिली जात नव्हती. अपवादात्मक काही इमारतींना अटी आणि शर्थीने शहरात परवानगी दिली गेली आहे. यामध्ये संबंधित बांधकाम व्यावसायिकांनीच आपत्तकालिन स्थितीचा सामना करण्यासाठी ११ मजल्यावर आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्याचे म्हटले होते. नियम व अटी पूर्ण कराव्या लागत असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी ११ मजल्यावरील इमारती बांधण्यास अडचणी येत होत्या.

यामुळेच महापालिकेने राज्य शासनाकडे टर्न टेबल लॅडर खरदेसाठी प्रस्ताव पाठविला. राज्यशासनाने मात्र, १०० टक्के निधी देण्यास असमर्थता दशर्वली. अखेर राज्य शासनाने ५० टक्के राज्यशासन आणि ५० टक्के महापालिका हिस्सा अशा अटीवर निधीला मंजूरी दिली. मनपाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने ५ कोटी ५० लाखांचा निधी देणे शक्य नव्हते. त्यामुळे काही दिवस टर्न टेबल लॅडर खरेदीचा विषय मागे पडला होता. बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असणाऱया क्रीडाईने वारंवार मागणी केल्याने अखेर मनपाने बजेटमध्ये निधीची तरतूद केली. यानंतर लॅडर खरेदीची प्रक्रियेला गती आली. जपानमधील कंपनीला लॅडर तयार करण्याचे टेंडर दिले होते. लॅडर तयार झाले असून मुंबईत दाखलही झाले आहे. कागदोपत्री प्रक्रिया केली जाणार असून तीन दिवसांत कोल्हापूरमध्ये लॅडर दाखल होईल. यामुळे ५५ मीटरवर कोणतीही आपत्ती घडल्यास मनपाला त्यावर मात करणे शक्य होणार आहे.

पुढील महिन्यांत सेवेत दाखल
टर्न टेबल लॅडर खरेदी केलेल्या कंपनीची टिम कोल्हापुरात येणार आहे. ते मनपाच्या अग्निशमन दलातील जवानांना टर्न टेबल लॅडर कशा प्रकारे हातळावा याचे प्रशिक्षण देणार आहेत. त्यामुळे पुढील महिन्यांतच टर्न टेबल लॅडर प्रत्यक्षात सेवेत दाखल होईल.

हद्दवाढीवर काही अंशी पर्याय
हद्दवाढ झाली नसल्याचा बांधकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसत आहे. बांधकामांच्या दृष्टीने शहराची आडवी वाढ होण्यास मर्यादा आहेत. उभी वाढ होण्यासही टर्न टेबल लॅडर नसल्याने अडथळा होता. आता हा अडथळाही दूर झाला आहे.

दोन कोटी कस्टम डय़ूटी जमा करावी लागणार
महापालिकेला टर्न टेबल लॅडर ताब्यात घेण्यासाठी सुमारे दोन कोटी रूपये कस्टम डय़ूटी जमा करावी लागणार आहे. तसेच कागदपत्रांचीही पूर्तता करावी लागणार आहे. यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागणार असून बुधवारी लॅडर कोल्हापुरात दाखल होईल.
रणजित चिले, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

टर्न टेबल लॅडरसाठी एकूण निधी -११ कोटी
मनपाचा हिस्सा-५ कोटी ५० लाख
कस्टम डय़ूटी- २ कोटी
टर्न टेबल लॅडरचा वापर-५५ मीटरवर
सध्या मनपाकडे असणाऱया यंत्रणाची क्षमता-१५ मीटरपर्यंत

Related Stories

हस्तशिल्प वस्तू निर्यातीसाठी गुणवत्ता, डिझाईन, पॅकिंगवर लक्ष आवश्यक

Patil_p

बॉशच्या निव्वळ नफ्यात पाचपट वाढ

Amit Kulkarni

महादरे तळ्याने गाठला तळ

Patil_p

देशांतर्गत हवाई वाहतूकीत लक्षणीय वाढ

Amit Kulkarni

जिह्यात चाचण्या घटल्या; 623 नवे रूग्ण

Patil_p

मटका अड्ड्यांवर बोरगाव पोलिसांची कारवाई

Archana Banage