10.3 टन सोन्यासह बँकांमध्ये 16 हजार कोटींच्या ठेवी
तिरुपती / वृत्तसंस्था
देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेल्या तिरुमला-तिरुपती देवस्थानने मंदिराची एकूण संपत्ती जाहीर केली. ट्रस्टने नुकतीच एक श्वेतपत्रिका जारी केली असून त्यामध्ये मंदिराच्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 5,300 कोटी रुपयांचे 10.3 टन सोने आणि 15,938 कोटी रोख जमा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मंदिराची एकूण मालमत्ता 2.26 लाख कोटी असल्याचेही जाहीर केले आहे.
मंदिर प्रशासनाने नुकतीच तिरुपती देवस्थानच्या संपत्तीची माहिती जाहीर केली. त्यानुसार 2019 पर्यंत विविध बँकांमध्ये 13,025 कोटी रोकड होती, ती वाढून 15,938 कोटी झाल्याचे सांगितले. गेल्या तीन वर्षांत एकूण रकमेत 2,900 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, 2019 पर्यंत बँकेतर गुंतवणुकीव्यतिरिक्त 7.339 टन सोने जमा होते असेही नमूद करण्यात आले आहे. या सोन्यामध्ये गेल्या गेल्या तीन वर्षांत आणखी 2.9 टनांनी वाढ झाली असल्याने आता एकूण सोने-नाणे 10.3 टनांवर पोहोचल्याचे सांगण्यात आले.
7 हजार 123 एकरमध्ये एकूण 960 मालमत्ता
देणगीच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आंध्रप्रदेशातील तिरुमाला तिरुपती मंदिर आहे. मंदिरात विविध ठिकाणी 7 हजार 123 एकरात पसरलेल्या एकूण 960 मालमत्ता आहेत. चांदीपासून ते मौल्यवान वस्तू, नाणी, कंपनीचे शेअर्स आणि मालमत्ता यासारख्या वस्तूही येथे दान केल्या जातात. मंदिर ट्रस्टच्या संपत्तीबाबत वेगवेगळय़ा अफवा पसरवल्या जातात. पण, त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन ट्रस्टच्या पदाधिकाऱयांनी केले आहे. बँकांमध्ये जमा केलेली रोख आणि सोन्याची गुंतवणूक अत्यंत पारदर्शक आणि योग्य पद्धतीने केली जाते, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले.
सर्वात श्रीमंत मंदिर
दक्षिण भारतातील सर्व मंदिरे त्यांच्या भव्यतेसाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. तिरुपती बालाजी मंदिर सर्वात लोकप्रिय आहे. हे मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिह्यात असून ते भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. येथे दररोज कोटय़वधी रुपयांच्या देणग्या येतात. बालाजी मंदिरात दिवसातून तीन वेळा दर्शन घेतात. सकाळी होणाऱया पहिल्या दर्शनाला विश्वरूप म्हणून ओळखले जाते. दुसरे दर्शन दुपारी आणि तिसरे दर्शन रात्री होते. भगवान बालाजीची संपूर्ण मूर्ती शुक्रवारी सकाळी अभिषेकाच्या वेळीच पाहता येते. बालाजीच्या मंदिराशिवाय येथे आकाश गंगा, पापनाशक तीर्थ, वैकुंठ तीर्थ, जलवितीर्थ, तिरुचनूर अशी इतर अनेक मंदिरे आहेत. ही सर्व ठिकाणे देवाच्या विविध लीलांशी संबंधित आहेत.