नव्याने उभारणीचे काम चालू असल्याने निर्णय, फातोर्डातील हॉकी मैदानासाठीच्या जागेची निवड
प्रतिनिधी/मडगाव
माडेल येथील घाऊक मासळी मार्केट नव्याने उभारण्याचे काम सुरू असून त्यात अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सदर मार्केट तात्पुरत्या कालावधीसाठी फातोर्डातच अन्यत्र स्थलांतरित करण्याचे ठरविण्यात आले असून त्यासाठी एसजीपीडीएचे अध्यक्ष आमदार दाजी साळकर, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी पाहणी केली. यावेळी एसजीपीडीए तसेच जीएसआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.
फातोर्डातील सदर सखल जागा सोनसडा येथील इनर्ट टाकून भरून काढण्यात आली होती. येथे हॉकी मैदान तयार करण्यात येणार आहे. मात्र सध्या ही जागा तात्पुरत्या कालावधीसाठी माडेल येथील घाऊक मासळी मार्केट स्थलांतरित करण्यासाठी वापरात आणली जाणार आहे, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले. फातोर्डातील तीन जागा या तात्पुरत्या स्थलांतरासाठी निवडण्यात आल्या होत्या. मात्र या ठिकाणी जवळपास लोकवस्ती नसल्याने तसेच पार्किंगच्या बाबतीत कोणतीही समस्या नसल्याने निश्चित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
माडेल येथील घाऊक मासळी मार्केट चांगल्या प्रकारे उभारण्यासाठी ही सोय करणे आवश्यक होते. ही काही कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने कोणाचा आक्षेपही असू शकत नाही. गोमंतकीयांचे मासळी प्रेम सर्वांना माहीत आहे व बाजार स्थलांतरित न करता बंद केला, तर मासळीचे दर कुठे पोहोचतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण विरोधी गटातील आमदार असूनही सहकार्य करत आहे, असे आमदार सरदेसाई यांनी स्पष्ट केले. या जागेसंदर्भात आवश्यक नियोजन करून आराखडा तयार करण्याचे जीएसआयडीसीच्या अधिकाऱयांन निर्देश देण्यात आले असून सर्व गोष्टी सुरळीत जाग्यावर पडल्यास पंधरवडय़ानंतर मासळी मार्केट स्थलांतरित करणे शक्मय असल्याचे प्राधिकरणाचे अध्यक्ष साळकर यांनी सांगितले. येथे योग्य प्रकारे विजेची सुविधा पुरवावी तसेच कचरा संकलन करावे, अशा सूचना आमदार कामत यांनी केल्या.