तस्करांकडून लाकूड, वाहने, एअरगन, मशिन्स, सोने, रोकड जप्त
धारबांदोडा : खैरीच्या झाडांची अवैध कत्तल आणि तस्करी करणाऱ्या टोळीला वनखात्याने रंगेहाथ पकडून गजाआड केले आहे. त्यांच्याकडून सुमारे रु. 1 लाख किंमतीचे खैरीचे लाकूड, 2 चारचाकी वाहने, 1 एअरगन यासह रु. 4 लाख रोख, 2 सोन्याच्या अंगठ्या, 1 सोनसाखळी व लाकूड कापण्याचे यंत्र जप्त केले आहे. तामसडो धारबांदोडा येथील सर्व्हे क्र. 7 मध्ये सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या संदेश सूर्यकांत नाईक यांच्यासह अकरा जणांना वनखात्याने अटक केली आहे. रानडुक्कर असल्याचे भासवून पाळीव डुकरांची कत्तल करणाऱ्या संशयितावर पेटके धारबांदोडा येथे केलेल्या कारवाईनंतर वनखात्याने केलेली ही दुसरी धडक कारवाई आहे.
पहिल्यांदा पकडले सातजणांना
कुळे विभागीय वनअधिकारी नारायण प्रभू देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी 4 वा. तामसडो धारबांदोडा येथील सर्व्हे क्रमांक 7 मध्ये खैर झाडाची कत्तल सुरु असल्याची माहिती वनखात्याला मिळाली. तेथील हालचालीवर पाळत ठेवून सायं. 7 वा. खैर झाडांच्या लाकडानी भरलेल्या सुमो गाडीसह 7 जणांना ताब्यात घेण्यात आले.
वनखात्याच्या पथकाने मोठ्या युक्तीने पकडले सूत्रधाराला
सात जणांना ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशीत या तस्करीमागे संदेश सूर्यकांत नाईक हा मुख्य सूत्रधार असल्याची वन अधिकाऱ्यांची खात्री पटली. वनखात्याच्या पथकाने संशयित संदेश याच्याशी फोनवर संपर्क साधून खैर झाडांचे लाकूड घेऊन जाणारी जीए 04 सी 3296 ही सुमो गाडी पंक्चर झाल्याचे सांगितले. त्यानुसार रात्री 11 वा. संशयित संदेश नाईक हा आणखी तिघा साथीदारांना सोबत घेऊन स्कोर्पिओ कार जीए 01 आर 7387 मधून घटनास्थळी दाखल झाला. सापळा रचून बसलेल्या वनखात्याच्या पथकाने ताबडतोब त्याला ताब्यात घेतले आणि या तस्करीचा संपूर्ण
झटपट पैसा कमवण्याचा काळा धंदा
यापूर्वीही ओकांब धारबांदोडा येथे वनखात्याने अशाच प्रकारची कारवाई केली होती. खैर झाडाच्या लाकडाचा वापर औषध, कात व फर्निचरसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याला मागणी भरपूर असून त्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे झटपट पैसा करण्याच्या या धंद्यात अनेकजण ओढले जातात.
सूत्रधार सावंतवाडीचा, साथीदार कर्नाटकचे
संशयित संदेश नाईक याला यापूर्वीही अशा प्रकारच्या तस्करीमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांच्या नंबर प्लेटस बदलल्या जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे. जी सुमो गाडी जप्त करण्यात आली आहे तिचाही नंबर बदलण्यात आलेला होता. मुख्य सूत्रधार हा सावंतवाडी येथील असून उर्वरित संशयित मूळ कर्नाटक राज्यातील आहे. हे सर्वजण पर्ये येथे भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. वनअधिकारी नारायण प्रभूदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली धारबांदोडा येथील वनकर्मचारी गोपाळ जल्मी, वनरक्षक रामनाथ पेडणेकर, आशिष नाईक, बाबी मांद्रेकर व इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.