राजस्थानच्या दांता रामगढ मतदारसंघ चर्चेत
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील दांता रामगढ मतदारसंघ चर्चेत राहिला आहे. काँग्रेस आमदार वीरेंद्र सिंह यांना अत्यंत मोठे आव्हान मिळत असून हे आव्हान जननायक जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. रीता सिंह चौधरी या देत आहेत. डॉ. रीता सिंह चौधरी या आमदार वीरेंद्र सिंह यांच्या पत्नी आहेत.
प्रचारादरम्यान दोघांनीही परस्परांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. ही लढाई वैयक्तिक स्वरुपाची नाही. आम्ही दोघेही निवडणूक लढवत आहोत असे रीता सिंह यांनी म्हटले आहे. रीता सिंह कधीच काँग्रेसच्या सदस्य नव्हत्या. त्या जननायक जनता पक्षाच्या महिला शाखेच्या अध्यक्ष आहेत. जजपने राजस्थानात यावेळी अनेक उमेदवार उभे केले आहेत.
कुणाविरोधात उभे राहण्याचा हा मुद्दा नाही. सीकर जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केले आहे. मागील वेळी काँग्रेसने मला दांता रामगढची उमेदवारी दिली होती. परंतु काही कारणांमुळे निवडणूक लढविता आली नव्हती. परंतु जनतेसाठी भूमिका घ्यावीच लागते. याचमुळे निवडणूक लढविण्याचे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रीता सिंह आणि त्यांचे पती वेगवेगळ्या ठिकाणी राहत असले तरीही कायदेशीर दृष्ट्या विवाहित आहेत. पत्नी विरोधात उभी राहिल्याने माझ्या मतांवर कुठलाच प्रभाव पडणार नसल्याचा दावा वीरेंद्र सिंह यांनी केला आहे. त्यांचे वडिल नारायण सिंह हे राजस्थान काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते.