मारिया निसान या महिलेच्या हातात अशी जादू आहे की ती कचऱयात पडलेली सिंगल युज प्लास्टिकची पिशवी, बॉटल आणि बॅग्जना सुंदर कलाकृतीत बदलून टाकते. पर्यावरण कार्यकर्त्या मारिया या जॉर्डनची राजधानी अम्मान येथे राहतात. त्यांना सध्या जगभरातून स्वतःच्या या कामामुळे प्रसिद्धी प्राप्त होत आहे. रस्त्यांवर कचऱयात फेकलेल्या बाटल्या आणि प्लास्टिक बॅग उचलून त्यांना सुंदर सामग्री आणि कलाकृतीत त्या रुपांतरित करतात.
मारिया निसान यांनी तयार केलेली एक कलाकृती अम्मानच्या एका इमारतीवर झळकली आहे. 2000 प्लास्टिक बॉटल्स आणि 1 हजार शॉपिंग्स बॅग्जपासून ही कलाकृती तयार करण्यात आली आहे. यात 150 हुक पाइपचाही वापर करण्यात आला आहे. मारिया यांच्या सर्व कलाकृती या आकर्षक आहेत.
मारिया या मूळच्या अमेरिकन नागरिक आहेत. पहिल्यांदा अम्मान येथे आल्यावर त्यांना तेथे चांगले वाटले, परंतु सर्वत्र फैलावलेला प्लास्टिकचा कचरा पाहून त्यांना वाईटही वाटले. शहराच्या सौंदर्याला खराब करणारा प्लास्टिकचा कचरा 35 वर्षीय मारिया यांना खटकू लागला.
पर्यावरणासंबंधी काम करणे आणि जागरुकता फैलावणाऱया मारिया यांनी प्लास्टिकच्या समस्येपासून मुक्तता मिळविण्यासाठी स्वतःची पद्धत अवलंबिली. राजधानी अम्मानच्या रस्त्यांवरून प्लास्टिकचा कचरा उचलून त्यानंतर अत्यंत मेहनतीने आणि क्रिएटिव्ह पद्धतीने त्याचा वापर करतात. रस्त्यांवर रंगबिरंगी चमकदार प्लास्टिकच्या बॅग्ज, ग्लास, बॉटल्स, सोडा कॅन आणि कँडी बारची रॅपर्स विखुरलेली असतात. या गोष्टी जमा करून कलाकृतीत त्यांना रुपांतरित करण्याचा विचार आल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका आणि इटलीमधून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते.
जॉर्डनमध्ये 12 कार्यक्रमांमध्ये त्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. तर ग्रीस, इटली आणि काही अन्य देशांनीही त्यांच्या कलाकृतींचे सादरीकरण केले आहे. जॉर्डनमध्ये एक वर्षात सुमारे 2.2 दशलक्ष टन घनकचरा तयार होतो, यातील केवळ 7 टक्के कचऱयाचा पुनर्वापर केला जातो असे त्यांचे सांगणे आहे. त्यांनी या कचऱयाचा वापर करून मानवी चित्रे, फुल-रोपे आणि अनेक प्रकारच्या गोष्टी तयार केल्या ओत. स्वतःच्या घराच्या छतावर प्लास्टिकच्या बाटल्यांना जोडून त्यांनी एक कॅनोपी तयार केली आहे. याकरता त्यांनी रेजर, टूथब्रश, लाइटर्स, पेन, प्लास्टिकचे चमचे आणि ग्लासपासून अनेक गोष्टींचा वापर केला आहे. सिंगल यूज प्लास्टिकचे प्रदूषण सर्वात धोकादायक आहे. अशाप्रकारच्या प्लास्टिकच्या वापरावर कर आकारण्यात यावा असे त्यांचे म्हणणे आहे.