लवकरच पुतळय़ाचे लोकार्पण
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यातील खैरवाड येथे श्री शिवछत्रपती सेवा संघातर्फे गावच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवस्मारक उभारण्यात येत असून या ठिकाणी सिंहासनाधिष्ठित शिवाजी महाराजांची मूर्ती बसविण्यात येणार आहे. या शिवस्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. इच्छुकांनी या शिवस्मारकास देणगी द्यावी, असे आवाहन सेवा संघातर्फे केले आहे.
खैरवाड येथील युवकांनी शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा संकल्प केला. सावगाव येथे साकारण्यात आलेल्या शिवस्मारकाच्या धर्तीवर शिवस्मारक निर्माण करण्याचा संकल्प केला. या दृष्टीने ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तरुणांनी आराखडा तयार करून स्वतःच श्रमदान करत अवघ्या दोन महिन्यात स्मारकाचे काम पूर्णत्वास नेले. स्मारकाच्या ठिकाणी पंचधातूची सिंहासनाधिष्ठित शिवाजी महाराजांची मूर्ती बसविण्यात येणार आहे.
500 किलो तांबे, पितळ महिलांनी जमविले
मूर्तीचे काम कोल्हापूर येथील कारागिरांना दिले आहे. मूर्तीसाठी लागणारा पंचधातू देण्यामागे गावातील महिलांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे. युवकांनी आवाहन करताच गावातील महिलांनी आपल्या घरातील पितळी व तांब्याच्या वस्तू या मूर्तीसाठी दिल्या. जमा केलेल्या घागरी, तपेले, मोठी भांडी, हंडे हे सर्व वितळवून पंचधातूची मूर्ती करण्यात येणार आहे. आतापर्यंत 500 किलो तांबे, पितळ जमविण्यात आले आहे. एकूण 900 किलोची पंचधातूची मूर्ती तयार करण्यात येणार आहे. अद्यापही महिला आपल्याकडील वस्तू या मूर्तीसाठी देणगी देत आहेत.
शिवरायांच्या चरणांची मिरवणूक
स्मारकात बसविण्यात येणाऱया शिवरायांच्या मूर्ती निर्मितीचे काम नुकतेच विधिवत पूजा करून केले. मूर्तिकारांनी शिवाजी महाराजांच्या पाद्यांची खैरवाड येथे पूजा केली. या चरणांची गावात मिरवणूक काढून मूर्तीच्या पुढील कामासाठी चालना दिली. येत्या महिन्याभरात मूर्तीचे काम पूर्ण होणार आहे. यानंतर मूर्ती स्थापन करून शिवस्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यासाठी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू असून स्मारकाचेही काम तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.