Tarun Bharat

काणकोण पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम निकृष्ट

नगरसेवक धीरज ना. गावकर यांचा पत्रकार परिषदेत दावा : प्रकल्पासंदर्भात ‘जी-सुडा’ अजिबात गंभीर नाही

प्रतिनिधी /काणकोण

‘जी-सुडा’ योजनेखाली काणकोण पालिकने बांधायला घेतलेल्या नवीन प्रशासकीय इमारत प्रकल्पाच्या बाबतीत ‘जी-सुडा’ अजिबात गंभीर नसल्याचा दावा करताना निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे काणकोण तालुक्यात परत एकदा इमारत दुर्घटना घडण्याची भीती काणकोणचे नगरसेवक धीरज ना. गावकर यांनी चावडीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

या प्रकल्पावर ‘जी-सुडा’ 11 कोटी रु. इतका खर्च करणार असून तरीही अत्यंत कूर्मगमीने काम चालू आहे. प्रकल्पाची बांधणी गुप्तरीत्या म्हणण्याप्रमाणे करण्यात येत आहे. बांधकामाच्या वेळी ‘जी-सुडा’च्या जबाबदार व्यक्ती उपस्थित नसतात. लोकनियुक्त प्रतिनिधी असलेल्या नगरसेवकांना देखील बांधकामाची पाहणी करायला मज्जाव केला जातो, असा आरोप गावकर यांनी केला. ‘व्हिजन अँड मिशन’ने बोलाविलेल्या या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष श्यामसुंदर देसाई, गोवा फॉरवर्डचे विकास भगत, काँग्रेसचे जनार्दन भंडारी, वैष्णव पेडणकेर, मनेष ना. गावकर हजर होते.

  या बांधकामासाठी खडीची भुकटी वापरली जात आहे. एका बाजूचे खांबे कललेले आहेत. इमारत पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात नागरिकांची वर्दळ राहणार आहे. पालिकेत 50 पेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत. या बांधकामाचा दर्जा अत्यंत खराब असल्याच्या तक्रारीवरून नुकतीच सभापती रमेश तवडकर, नगराध्यक्ष रमाकांत गावकर, नगरसेवक धीरज ना. गावकर यांनी या बांधकामाची पाहणी केली होती आणि ठेकेदाराला समज दिली होती. तरी देखील या कामाकडे ‘जी-सुडा’ गांभीर्याने पाहत नसल्यामुळे हा प्रकार संशयास्पद वाटतो. या ठिकाणी केलेले निकृष्ट बांधकाम पाडून नव्याने उभारणी सुरू करावी नपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जनार्दन भंडारी यांनी दिला.

  हीच परिस्थिती दुमाणे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची देखील आहे. या प्रकल्पाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्या ठिकाणी कचऱयाचे ढीग साचलेले आहेत. कचऱयाचे व्यवस्थित व्यवस्थापन करावे आणि त्यानंतरच उर्वरित रक्कम ठेकेदाराला देण्यात यावी, अशी मागणी धीरज ना. गावकर यांनी केली. त्याशिवाय कुंकळ्ळी ते काणकोण रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करणे, काणकोणच्या कोकण रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या जलद रेल्वेगाडय़ा थांबविणे, या मतदारसंघातील वीज, पाण्याच्या समस्या त्वरित सोडविणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. दिलेल्या मुदतीत जर ही कामे केली नाहीत, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा भंडारी यांनी दिला.

Related Stories

जनतेची तडफड, खनिजाची ओरबड!

Amit Kulkarni

पेडणे तालुक्यात 100 टक्के प्रतिसाद

Omkar B

एफसी गोवाचा सामना आज चेन्नईनशी

Amit Kulkarni

सत्तरीतील जमीन मालकी प्रश्नी उद्यापासून ऐतिहासिक मोर्चा

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांना न जुमानता मंत्र्यांचे निर्णय

Patil_p

प्रेमी युगुलाला लुटणारे पोलिस निलंबीत

Amit Kulkarni