लक्ष्मीटेकडी बुडा कॉलनीतील तलावाचे काम चार वर्षांपासून अर्धवट : प्लॅटफॉर्म-जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्यावतीने शहरातील विविध भागात उद्यान, क्रीडासंकुल आणि जलतरण तलाव निर्माण करण्यात आले आहेत. शंभर कोटी अनुदानामधून लक्ष्मीटेकडी परिसरातील खुल्या जागेत निर्माण करण्यात येत असलेल्या जलतरण तलावाचे काम अर्धवट झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून सदर काम सुरू असून जलतरण तलावाचे काम कधी पूर्ण होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
महापालिकेला शंभर कोटी अनुदान मंजूर झाल्याने शहरातील विविध भागात क्रीडासंकुल उभारण्यात आले आहेत. गोवावेस येथे एकाच ठिकाणी महापालिकेचे जलतरण तलाव आहे. काही ठिकाणी खासगी जलतरण तलाव आहेत. त्यामुळे जलतरणप्रेमींसाठी शहरातील विविध भागात जलतरण तलाव निर्माण करण्यासाठी शंभर कोटी अनुदानामधून निधीची तरतूद केली होती. अशोकनगर, हनुमाननगर आणि लक्ष्मीटेकडी अशा तीन ठिकाणी तलाव निर्माण करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यापैकी अशोकनगर येथील जलतरण तलाव आणि क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हनुमाननगर येथे जलतरण तलाव, उद्यान आणि खुली व्यायाम शाळा निर्माण केली आहे. येथील उद्यान नागरिकांसाठी खुले केले. पण जलतरण तलावाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही.
लक्ष्मीटेकडी येथील बुडा कॉलनीतील खुल्या जागेत टेनिस कोर्ट, हॉलीबॉल कोर्ट, समुदाय भवन आणि जलतरण तलाव निर्माण करण्यात आला आहे. जलतरण तलावाचे बांधकाम झाले असून प्लॅटफॉर्म आणि जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचे काम रखडले आहे. याठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा ठेवण्यात आली आहे, पण बसविण्याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. हे काम पूर्ण करण्याकडे महापालिकेच्या अभियंत्यांसह कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच येथील खुल्या जागेभोवती घालण्यात आलेली संरक्षक भिंत पावसाळय़ात कोसळली होती. कोसळलेल्या भिंतीचे बांधकाम करण्यात आले. पण त्यानंतर येथील उर्वरित भिंतदेखील कोसळली आहे. संरक्षक भिंतीचे काम बांधकाम करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे अर्धवट कामे कधी पूर्ण करणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. जलतरण तलावाचे काम पूर्ण झाल्यास विजयनगर, विनायकनगर, सहय़ादीनगर अशा विविध परिसरातील जलतरणपटूंना सोयीचे होणार आहे. यामुळे जलतरण तलावाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.