कोल्हापूर : बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापुरच्या कार्याध्यक्षपदी देवालय समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांची निवड करण्यात आली असून अन्य पाच जणांना ट्रस्टी म्हणून घेण्यात आले आहे. या निवडी नियमाला धरून केल्या आहेत. या निवडी प्रसंगी हे विरोध करणारे ट्रस्टीदेखील उपस्थित होते. त्यानी प्रोसिडिंगवर सह्या केल्या आहेत. जर ही मंडळी आदमापूर गावातील लोकांना ट्रस्टी म्हणून घ्यायला नकार देत असतील तर कारभार कसा करणार? असा सवाल आज ग्रामस्थ इतर ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.
आदमापूर ता. भुदरगड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. जर कार्याध्यक्ष पदासाठी विरोधच होता तर त्यावेळी त्यांनी सह्या का केल्या असा सवाल करीत भोसले म्हणाले, दिनांक 18 जानेवारी 2023 रोजीच्या मीटिंगमध्ये आदमापुर गावातील दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, यांना नवीन ट्रस्टी म्हणून घेण्याची मान्यता यांनीच दिली असल्याचे भोसले यांनी सांगितले. केवळ ही मंडळी आदमापूर गावातील आहेत. म्हणून यांचा विरोध सुरू आहे. याबाबत आदमापुर ची जनताच योग्य निर्णय घेईल, असा इशारा भोसले यांनी दिला.
समितीचे माजी कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम हयात असताना 3 फेब्रुवारी 2023 रोजी जी मीटिंग झाली. त्या मीटिंगच्या आयत्या वेळच्या विषयांमध्ये स्वतः मगदूम यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी कार्याध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळावा अशी विनंती केली होती. तशा पद्धतीची नोंद करून त्यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची धुरा सोपवून त्यांची निवड केली. या निवडीवर प्रोसिडिंगवर सर्वाच्या सह्या आहेत. मग हे विरोध का करतात हेच कळत नसल्याचे त्यांनी सांगितले. आदमापुरचे सरपंच विजय गुरव हे या दोन्ही मिटींगच्या वेळी गैरहजर होते. त्यांना या संदर्भात रीतसर मीटिंग नोटीस दिली होती. पण ते मिटींगला गैरहजर होते. जे विजय गुरव बाळूमामा देवालयामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप करत आहेत. ते या देवालयाच्या ट्रस्टीमध्ये पदसिद्ध सदस्य आहेत. याचा त्यांना विसर पडलाय की काय? देवाची नाहक बदनामी का करत आहेत? असा सवाल ग्रामस्थांनी करून त्यांच्या या प्रवृत्तीचा या पत्रकार परिषदेच्या वेळी जाहीर निषेध केला.
या पत्रकार परिषदेला कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, बजरंग दूध संस्थेचे चेअरमन यशवंतराव पाटील, संभाजी पाटील, संदीप मगदुम, इंद्रजित खर्डेकर, दिलीप पाटील, डॉ. संताजी भोसले, युवा नेते नामदेव पाटील आदी उपस्थित होते.