राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार उद्घाटन
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाच्या कारणास्तव गेल्या दोन वर्षांपासून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला जगप्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सव यंदा उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दसरोत्सवासाठी सांस्कृतिक नगरी म्हैसूर सजली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहा दिवसांच्या दसरोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ होत असून म्हैसूरच्या चामुंडी टेकडीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दसरोत्सवाला चालना देणार आहेत.
चामुंडी टेकडीवर सोमवारी सकाळी 9.45 ते 10.05 या वेळेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रथामध्ये विराजमान होणाऱया चामुंडेश्वरी उत्सव मूर्तीला पुष्प अर्पण करण्यात येणार आहे. तसेच देवीचे पूजन करून 10 दिवसांच्या जगप्रसिद्ध दसरा महोत्सवाला अधिकृतपणे चालना देणार आहेत. दसरा उत्सवाच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रपतींसमवेत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, केंद्रीय मंत्री, वडेयर घराण्याचे वंशज, राज्यातील अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.
यंदाचा दसरोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजपासून म्हैसूर शहर दिव्यांनी उजळून निघणार आहे. 5 ऑक्टोबर विजयदशमी दिवशी जगप्रसिद्ध दसरा जम्बो सवारीची मिरवणूक काढली जाणार आहे. त्यादिवशी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दुपारी 2.36 ते 2.50 यावेळेत कोटे अंजनेयस्वामी मंदिराजवळील नंदी ध्वजाची पूजा केल्यानंतर जम्बो सवारीला प्रारंभ होणार आहे. दसरा महोत्सवादरम्यान 10 दिवस म्हैसूरमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार उत्साहात दसरोत्सव साजरा करण्यासाठी म्हैसूर नगरी सज्ज झाली आहे.
दहा दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त
दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर म्हैसूरमध्ये सोमवारपासून 5 ऑक्टोबरपर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच अनुचित घटना घडू नये, यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. दरम्यान, वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून दसरा बंदोबस्तासाठी 5485 पोलिसांचे नियोजन करण्यात आले आहे. याचबरोबर शहरात सर्वत्र 13,140 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून 24 तास त्यावर नजर ठेवली जाणार आहे, ओ म्हैसूर जिल्हा पोलीस आयुक्त डॉ. चंद्रगुप्त यांनी दिली.