वृत्तसंस्था/ मुंबई
2023 साली आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद ओडिशा राज्यातील भुवनेश्वर आणि राऊरकेला ही शहरे भूषविणार आहेत. तत्पूर्वी विश्व हॉकी चषकाचा प्रवास सुरू झाला असून मुंबईत या चषकाचे जोरदार स्वागत करण्यात आले.
सदर विश्व हॉकी चषकाचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर हॉकी महाराष्ट्राच्या वरिष्ठ पदाधिकाऱयांनी स्वागत केले. यावेळी हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि आयपीएस कृष्णा प्रकाश तसेच हॉकी महाराष्ट्राचे सरचिटणीस मनीष आनंद, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज बोरे, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष धनंजय महाडिक उपस्थित होते. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ या चषकाचे जोरदार स्वागत करण्यात आले. या समारंभावेळी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि अर्जुन पुरस्कार विजेता हॉकीपटू एम. एम. सोमय्या, युवराज वाल्मिकी, जावेद शेख, वीरेन रास्किन्हा, बॉलिवूड क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शुक्ला, चित्राशी रावत, निशा नायर, हॉकीपटू ओंकार सिंग तसेच हॉकी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई नौदल डॉक यार्डचे व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादुर सिंग यांनी हा चषक स्वीकारला. सदर स्पर्धा 13 जानेवारीपासून भुवनेश्वर आणि राऊरकेला या शहरांमध्ये सुरू होणार असून ही 29 जानेवारीपर्यंत चालणार आहे.