1 इंचाचा डिस्प्ले अन् 2 तासांपर्यत चालतो व्हिडिओ
टेलिव्हिजन हे आमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा हिस्सा ठरले आहे. काळासोबत टीव्हीचे रंग-रुप देखील बदलले आहे. कधीकाळी भरभक्कम असणारा टीव्ही आता हळूहळू स्लिम झाला आहे. तर त्याच्या डिस्प्लेतही मोठा बदल घडून आला आहे. टायनी सर्किट्स नावाच्या हार्डवेअर कंपनीने एक विशेष इलेक्ट्रॉनिक उपकरण तयार केले असून त्याला जगातील सर्वात छोटा टीव्हीसेट मानले जात आहे.
सर्वसाधारणपणे लोक मोठय़ात मोठय़ा टीव्हीची इच्छा बाळगतात. परंतु खेळण्यासारख्या दिसणारा हा टीव्ही देखील कुणापेक्षा कमी नाही. कंपनीने टायनीटीव्ही2 आणि टायनीटीव्ही मिनी नावाने दोन टीव्ही सेट्स सादर केले आहेत.
ही कंपनी मिनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. जुन्या लुकच्या टीव्हीप्रमाणे दिसणारे हे उपकरण पोस्टल स्टॅम्पच्या आकाराचे आहे. परंतु याचा वापर सामान्य टीव्हीप्रमाणे करता येतो. यात चॅनेल आणि आवाज ऍडजस्ट करणारा नॉब्स, रिमोट कंट्रोल अणि 8जीबी स्टोरेज उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात संगणकाच्या मदतीने व्हिडिओही अपलोड करता येतात. हा टीव्ही बॅटरीने संचालित करता येतो, जो 2 तासांपर्यंत व्हिडिओ प्ले करू शकतो.
टायनीटीव्ही 2 चा डिस्प्ले केवळ 1 इंचाचा आहे. तर 0.6 इंचाच्या स्पीकरवर तो सेट करण्यात आला आहे. या टीव्हीत नवे व्हिडिओ अपलोड करण्याचीही सुविधा आहे. ओएलईडी डिस्प्ले असणाऱया या टीव्हीला जगातील सर्वात छोट टीव्ही मानले जात आहे. हा टीव्ही 4 ते 5 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तर रिमोटसाठी 1 हजार रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील.