परवानगी देण्यासाठी चालढकल
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून शनिवार दि. 4 रोजी पिरनवाडी येथे युवा मेळावा होणार होता. यासंदर्भात प्रशासनाकडून परवानगी देण्यास टाळाटाळ सुरू आहे. म. ए. समितीच्या सर्वच कार्यक्रमांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून प्रशासनाला धास्ती लागली आहे. त्यामुळे हा युवा मेळावा होऊ नये, यासाठी खटाटोप सुरू आहे. बेळगाव तालुक्यात एखादा युवा मेळावा व्हावा, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून युवा कार्यकर्त्यांमधून होत होती. पिरनवाडी येथील काही कार्यकर्त्यांनी पिरनवाडी येथे युवा मेळावा भरविण्याचे निश्चित केले. त्यानुसार चलो मुंबई या धरणे आंदोलनासोबतच युवा मेळाव्यासंदर्भातही जागृती करण्यात येत होती. युवा समितीच्या आदर्श शाळा व बक्षीस वितरण, त्याचबरोबर मुंबई येथील धरणे आंदोलनाला सीमावासियांनी तुफान प्रतिसाद दिल्यामुळे राष्ट्रीय पक्षांची झोप उडाली आहे. यामुळे सर्वच राष्ट्रीय पक्षांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. एकीकडे राष्ट्रीय पक्षांच्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित रहात असताना युवा समितीच्या मेळाव्याला परवानगी देण्यास टाळाटाळ होत आहे. परवानगी घेण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना खुल्या जागेत कार्यक्रम घेऊ नका, महाराष्ट्राच्या नेत्यांना निमंत्रण देऊ नका, प्रमुख कार्यकर्त्यांचे ओळखपत्र जमा करा, अशी आडकाठी पोलिसांकडून घातली जात आहे. म. ए. समितीच्या कार्यक्रमांना जाणीवपूर्वक परवानगी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप मराठी भाषिकांमधून केला जात आहे. राष्ट्रीय पक्षांना एक न्याय तर म. ए. समितीला एक न्याय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.