सोनसाखळीसह 2 लाखांची रोकड लंपास
प्रतिनिधी /म्हापसा
धुळेर म्हापसा येथील डॉ. तार पॉलीक्लिनिकमध्ये अज्ञात चोरटय़ांनी पाठीमागचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करून क्लिनिकमधील रोख रुपये 2 लाख, सोन साखळी आदी मिळून अडीच लाखांचा ऐवज पळविल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. ही चोरी पूर्वनियोजित पद्धतीने केली असल्याची माहिती डॉ. तार क्लिनिकचे डॉ. नीलेश तार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली असून याबाबत म्हापसा पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरटय़ांनी मागच्या दारातून आतमध्ये प्रवेश केला. डॉ. निलेश तार यांचे रु. 50 हजार, पॉलिक्लिनिकमधील एक लाख रुपये, देव्हाऱयातील देवाला घातलेली 50 हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. मात्र चोरटय़ांनी आतमध्ये असलेले दोन लॅपटॉप, एक आयफोन तसेच सुट्टे पैसे नेले नसल्याचे आढळून आले.
आमचे येथे पोर्तुगीजकालीन घर आहे. मागील दरवाजा कुठे आहे हे सहज कुणालाही समजणार नाही. अशा स्थितीत क्लिनिकमध्ये चोरटय़ांनी ही चोरी केली आहे. चोरटय़ांनी आतमध्ये येताना तीन ठिकाणचे लोखंडी गज तोडले आहेत, असे डॉ. तार यांनी सांगितले.
पहाटेपर्यंत सुरू असणारी बार बंद ठेवा : प्रवीण आसोलकर
यावेळी समाजसेवक प्रवीण आसोलकर म्हणाले की, येथे पदपथ नसल्याने रस्त्यावर काळोख पसरला आहे याकडे वीज खात्याने लक्ष द्यावे. गेले चार दिवस या भागात वीज पुरवठा खंडित आहे. याबाबत आम्ही वीज खात्याला माहिती दिली आहे, परंतु ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अन्य विशेष म्हणजे म्हापशात रात्री उशीरापर्यंत सुरू असणाऱया बार आस्थापनांकडे पोलीस तसेच अबकारी खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
पोलिसांनी पेट्रोलींग सुरू ठेवावे – श्वेता तार
आमच्या घरातील प्रवेशद्वार कुणालाच कळणार नाही कारण हे दार पोर्तुगीज कालीन असून ही चोरी कुणीतरी माहीत असणाऱयांनीच केली असावी अशी माहिती डॉ. श्वेता निलेश तार यांनी दिली. याचबरोबर या भागात पोलिसांनी रात्रीच्यावेळी पेट्रोलींग सुरू ठेवावे असे श्वेता तार यांनी सांगितले.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी ठसे तज्ञ, श्वानपथकाचा वापर करून तपास केला. उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक परेश नाईक व पोलीस पथक याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.