80 हजाराचे साहित्य लांबविले
वार्ताहर /किणये
खादरवाडी गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिर चोरट्यांनी फोडले आहे. चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून विठ्ठल-रखुमाई मूर्तीच्या डोक्यावरील चांदीचे किरीट, रखुमाई मूर्तीच्या गळ्dयातील मंगळसूत्र व इतर साहित्य लांबविले आहे. सदर चोरीचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला असून ही चोरी सोमवारी रात्री झाली असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात सोमवारी रात्री वारकरी मंडळी व मंदिर जिर्णोद्धार पंचकमिटी यांनी भजन करून नेहमीप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्याच्या व मुख्य दरवाजाला कुलूप लावून मंदिर बंद करून घरी निघून गेले.
मंगळवारी सकाळी मंदिरात पुजारी पूजा करण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच याची माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष परशराम गोरल यांना दिली. त्यानंतर मंदिरासमोर गावातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान चोरी केली असावी, असा संशय गावकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. चोरट्यांनी प्रारंभी मंदिराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्याची कडी तोडून दोन्ही मूर्तींच्या डोक्यावरील किरीट, मंगळसूत्र, मंदिरातील समई, टाळ जोड आदींसह सुमारे 80 हजारांचे साहित्य लांबविले आहे. वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली.