बॅटऱ्यासह इतर साहित्य लांबविले : परिसरातील गॅरेज मालकामध्येही भीती
वार्ताहर /उचगाव
उचगाव फाट्यानजीकच्या एका गॅरेजमध्ये बॅटरी व इतर साहित्याची चोरी झाली आहे. यामध्ये जवळपास एक लाखाची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. घटनेची अधिक माहिती अशी की, उचगावनजीक मिलिंद बाळू पुन्हाजीचे यांचे गॅरेज असून,यामध्ये वाहनांच्या बॅटऱ्या तसेच वाहनांचे साहित्य व लोखंडी साहित्य ठेवण्यात आले आहे. रात्री आठ वाजता गॅरेज बंद करून ते घरी गेले. यानंतर रात्री अकराच्या सुमाराला गॅरेजच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी आतील साहित्य घेऊन गेल्याचे उघड झाले आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हाजीचे नेहमीप्रमाणे गॅरेजकडे गेले असता गॅरेजचे दरवाजे उघडे दिसले. कुलूपही तोडल्याचे त्यांना आढळून आले. आत प्रवेश करून पाहतात तो आतील बरेचसे साहित्य चोरीला गेल्याचे आढळून आले. या घटनेने या मार्गावर असलेल्या अनेक गॅरेज मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची नोंद काकती पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.