तीन लाख रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास : तालुक्यात दहशतीचे वातावरण
प्रतिनिधी /खानापूर
कुसमळी येथे एका बंद घराचा दरवाजा फोडून सोन्याचे दागिने व रोख तीन लाख रुपये असा सहा लाखाचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. जांबोटीजवळील कुसमळी येथील महादेव सीताराम मुळीक यांच्या घरी संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ही धाडसी चोरी करण्यात आली आहे. ज्याप्रकारे तालुक्मयात गेल्या महिन्यापासून चोरीचे सत्र सुरू आहे. त्याचप्रकारे ही चोरी करण्यात आली आहे.
कुसमळी येथील महादेव मुळीक यांच्या बंद घराचे मागील दार चोरटय़ांनी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मुख्य दरवाजाला आतून कडी लाऊन घरातील दोन कपाटे फोडून सोन्याच्या दागिन्यांसह तीन लाख रुपये घेऊन चोरांनी पलायन केले. महादेव मुळीक यांचा एक मुलगा कुसमळी येथील धनलक्ष्मी सोसायटीत सेपेटरी आहे तर दुसरा भारतीय सैन्यात आहे. मळीक यांनी गावातील जमीन खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. यासाठी त्यांनी रक्कम जमा करण्यास सुरुवात केली होती.
सैन्यात असलेल्या मुलाने थोडी रक्कम शेतीच्या व्यवहारासाठी पाठवलेली होती. ती रक्कम बँकेतून तसेच गावातील फंडातून थोडी रक्कम मिळून तीन लाखाची रक्कम गुरुवारी घरात आणून ठेवली होती. सदर रक्कम शनिवारी शेती मालकाला देण्यात येणार होती. त्याच संदर्भातील कागदपत्रे आणण्यासाठी ते दुपारी तीन वाजता कुसमळी येथून खानापूर तहसीलदार कार्यालयाकडे गेले होते. तहसीलदार कार्यालयातील काम आटोपून ते पुन्हा कुसमळीला संध्याकाळी 6 वाजता आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
महादेव यांची पत्नी शेतावर होती. त्यांना आणण्यासाठी तसेच गवत आणण्यासाठी मुलगा नागेंद्र हा सायंकाळी पाच वाजता शेताकडे गेला. चोरटे बहुदा पाळत ठेऊन असावेत नागेंद्र हे शेताकडे गेलेले पाहता क्षणी त्यांनी घराचा मागील दारवाजा फोडून आत प्रवेश केला. घाई गडबडीत जे हाती लागतेय ते घेऊन चोरटय़ांनी पलायन केले.
चोरी झालेली खोली सीलबंद
सायंकाळी याबाबत खानापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश शिंगे आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ठसे तज्ञांना व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. शनिवारी सकाळी श्वानपथक घटनास्थळी येणार आहे. दुसऱया कपाटातील एक लॉकर चोरटय़ांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो लोकर उघडला नसल्याने त्याच्यातील सोन्याचा ऐवज व रक्कम चोरटय़ांच्या हाती लागली नाही. पोलिसांनी चोरी झालेली खोली सीलबंद केली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी चोरी झालेल्या शेजारील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र फुटेजमध्ये स्पष्ट काही दिसून येत नसल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांसमोर आव्हान
सतत होत असलेल्या चोरीमुळे तालुक्मयात घबराटीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून होत असलेल्या चोऱयांमुळे पोलिसांनी ग्रामीण भागात सभा घेऊन जागृती करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागात पोलिसांनी गस्तही वाढविली आहे. मात्र तरीही चोऱया थांबण्याचे चिन्ह दिसत नाही त्यामुळे चोरटय़ांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे.
जांबोटी भागात तीन दिवसांपासून खानापूरचे पोलीस निरीक्षक सिंगे, बैलहोंगल डीवायएसपी कटगी स्वतः बैठका घेत आहेत. या बैठकांचे सत्र सुरू असतानाच चोऱया होत आहेत. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. गावकऱयांना सूचना करूनही मोठी रक्कम अथवा सोने घरी का ठेवत आहेत, असाही प्रश्न पोलिसांनी निर्माण केला आहे.
अनोळखी दुचाकी संशयास्पद
गावातील शिवाजी पुतळय़ाजवळ एक अनोळखी संशयास्पद दुचाकी पोलिसांना सापडली आहे. चोरटे ही दुचाकी टाकून गेले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुचाकीवर असलेला नंबर हा चोरटय़ानी दुसऱया गाडीचा काढून लावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे.