राधानगरी /प्रतिनिधी
राधानगरी शहरामध्ये गेले महिनाभर महिनाभर सुरू असणाऱ्या चोरींचे सत्र सुरूच आहे. आज बुधवारी पहाटे शहरामध्ये पाच ठिकाणी धाडसी चोरीचे प्रकार घडले आहेत. या चोरट्याच्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.
राधानगरी शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या जैन मंदीरातील दानपेटी आणि तिजोरी फोडून चोरट्यानी ५ हजार रुपये रोख रक्कम लांबवली. तर सोन्याची शिरोली राधानगरी रोडवरीलदेवराज कोतमीरे व शांताराम कानकेकर यांनी आपआपल्या दारामध्ये पार्किंग केलेल्या होंडा कंपनीच्या दुचाकी चोरट्यानी लांबवल्या. तसेच राधानगरी ग्रामपंचायत जवळ असलेल्या ग्रामीण कोठा या फायनान्स कंपनीचे गेट तोडून दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून तिजोरी फोडली. यावेळी चोरट्यांना तिजोरीत रोख रक्कम न मिळाल्याने टेबलवर ठेवलेले हेल्मेट लांबवले. कंपनीत असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांचा प्रताप कैद झाला आहे. चोरट्यानी फायनान्स कंपनीचे गेट तोडण्यागोदर दारात लावलेल्या दुचाकीचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांनी एका कॅमेऱ्याची वायर तोडली आहे. चोरट्यांचा हा सर्व प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
चोरट्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात असलेल्या लाईफ केअर नावाच्या औषध दुकानाचे कुलूप तोडून १७ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या पाचही ठिकाणच्या चोऱ्या एकाच रात्रीत केलेल्या आहेत. फायनान्स कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे कैद झालेले आहेत. या दरम्यान ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले मात्र कोणतेही धागेदोरे हाती लागले नाही. दरम्यान या चोरीचा छडा लवकरात लवकर लावण्याची मागणी राधानगरी शहरातील नागरिकांमधून होत आहे.