सामान्य वापरकर्त्यांसाठी विनामूल्य : व्यावसायिक-सरकारी वापरकर्त्यांकडून मस्क यांची कमाईची योजना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भविष्यात ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क मोजावे लागण्याचे संकेत इलॉन मस्क यांनी ट्विट करून दिले आहेत. ‘ट्विटर नेहमीच सर्वसामान्य युजर्ससाठी विनामूल्य असेल. परंतु व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना यासाठी थोडी किंमत मोजावी लागू शकते’ असे ट्विट मस्क यांनी केले आहे. गेल्या आठवडय़ात ट्विटर विकत घेतल्यानंतर चर्चेत आलेला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आणि ट्विटर कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटरची सेवा जास्त काळ मोफत उपलब्ध होणार नाही, अशी भीती होती. त्यानुसार जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी स्वतःच यासंबंधी भाष्य केले आहे. त्यानुसार सत्यापित ट्विट एम्बेड करण्यासाठी किंवा कोट करण्यासाठी थर्ड पार्टी वेबसाईट्सकडून पैसे आकारण्याबद्दलही त्यांनी बोलले. यासह, मस्कने ब्लू टिक प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवेमध्ये बदल सुचवले होते, ज्यात त्याची किंमत निश्चित करणे समाविष्ट आहे. सध्या ट्विटर प्रीमियम ब्लू सेवेची किंमत 2.99 डॉलर इतकी आहे.
जुन्या व्यवस्थापनात बदल शक्य
ट्विटर विकत घेतल्यानंतर इलॉन मस्क यांनी व्यवस्थापन आणि प्रणालीमध्येही काही बदल करण्याचे सुतोवाच केले आहे. ट्विटरचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी हेड विजया गडदे यांना ते पायउतार होण्यासाठी सांगू शकतात, अशी चर्चा जोरात सुरू आहे. पराग अग्रवाल आणि विजया गडदे यांना हटवले जाणार असले तरी अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही. मस्क यांनी ट्विटरचा नवा सीईओ निवडल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याच्या नावाची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मस्क यांनी ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना कंपनीच्या व्यवस्थापनावर अजिबात विश्वास नसल्याचे सांगितले. सिक्मयुरिटी एक्स्चेंज कमिशन (एसईसी) मध्येही त्यांनी ही गोष्ट सांगितली आहे. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी ते व्यवस्थापन आणि अधिकाऱयांचा पगार कमी करू शकतात. तसेच इलॉन मस्कने ट्विटरला 44 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी करताच त्यांच्या कंपनीकडे या क्षेत्रातील दिग्गजांचा ओढा वाढलेला आहे. त्यामुळे ते दर्जेदार व्यक्तींची आपल्या कंपनीवर वर्णी लावू शकतात.