गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात वर्दळ वाढली : वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा : बराचवेळ वाहनधारक ताटकळत


प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात वर्दळ वाढली आहे. विशेषतः गणेश देखावे पाहण्यासाठी भाविक सायंकाळनंतर रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. मात्र बुधवारी दुपारी शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनधारकांना अडकून पडावे लागले. रहदारी पोलीस दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
शहरातील विविध रस्त्यांवर गणेशोत्सव मंडळाचे मंडप आहेत. अशातच बुधवारी शासनाने सुटी जाहीर केल्याने बाजारपेठेतील गर्दी वाढली. दुपारच्या दरम्यान विविध रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्याने मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, समादेवी गल्ली, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, नरगुंदकर भावे चौक, धर्मवीर संभाजी चौक आणि कॉलेज रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. कॉलेज रोडवर वाहनांच्या रांगा लागल्याने ट्रफिक सिग्नलदेखील कुचकामी ठरला.
गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी येणाऱया भाविकांची गर्दी रात्री होत असते. पण विविध कारणास्तव बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची गर्दी बुधवारी दुपारी वाढली होती. त्यामुळे ठिकठिकाणी वाहने पार्क करण्यात आली होती. अशातच प्रवाशांसाठी बाजारपेठेत फिरणाऱया प्रवासी रिक्षांची रेलचेल वाढली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका वाहनधारक आणि नागरिकांना बसला.
पोलिसांकडून रहदारीवर नियंत्रण
मारुती गल्ली, बसवाण गल्ली आणि अनसूरकर गल्लीकडून येणाऱया वाहनांची गर्दी मारुती मंदिरसमोर झाली होती. तसेच समादेवी मंदिरासमोर वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नार्वेकर गल्लीत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रहदारी पोलीस तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात नियुक्त करण्यात आलेल्या राखीव दलाच्या पोलिसांनी रहदारी नियंत्रण करीत वाहनधारकांचा मार्ग मोकळा केला. पण वाहनधारकांना ठिकठिकाणी बराच वेळ अडकून पडावे लागले.