सीईओ खिलारी यांचे आदेश अन् शिक्षणाधिकाऱ्यांचा थेट संस्थेच्या सचिवांना फोन; अशा शिक्षकास सेवेतून बडतर्फ करण्याच्या प्रतिक्रिया
सातारा प्रतिनिधी
कोल्हापुर जिह्यातील एका माध्यमिक शाळेच्या शिक्षकांवर पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला असून त्या प्रकरणी तेथील स्थानिक पोलिसांनी अटक करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, त्याची बदली सातारा जिह्यात संस्थेने केल्याचे वृत्त व्हायरल होताच तात्काळ सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दखल घेवून माद्यमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांना याबाबत सुचित केले. कोळेकर यांनी थेट शिक्षण संस्थेच्या सचिवांना फोन लावून तसला शिक्षक सातारा जिह्यात कोणत्याही शाळेवर पाठवू नका, असे स्पष्टच सुनावले. दरम्यान, अशा शिक्षकास सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
शिक्षक हा पिढी घडवतो असे म्हटले जाते. शिक्षकांकडून मुल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते. त्याच शिक्षकांकडून जर चुकीचे वर्तन होत असेल तर समाजातून तीव्र भावना उमटतात. अशाच कोल्हापूर जिह्यातील एका शाळेवर शिकवत असलेल्या शिक्षकांना गैरप्रकार केला. त्याच्यावर तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याप्रकरणी त्यास त्या पोलिसांनी अटक केल्याचे समजते. दरम्यान, त्याची बदली सातारा जिह्यातील एका डोंगरी भागातील शाळेत केल्याची माहिती मंगळवारी सकाळी मिळताच सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी तात्काळ माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती केळेकर यांना बोलवून घेतले. त्यांना या प्रकरणाबाबत विचारणा केली. त्यांनी हा प्रकार कोल्हापुर जिह्यातील आहे. आपल्या जिह्यात त्याची बदली केल्याचे मी आताच बातम्यात वाचले आहे. असे सांगत त्यांनी लगेच संबंधित शिक्षण संस्थेच्या सचिवांना फोन लावून विचारणा केली. सातारा जिह्याला एक नाव आहे. सातारा जिह्यातील सर्वच शाळा चांगल्या आहेत. शाळांचे वातावरण बिघवण्याकरता गैरवर्तन करणारा शिक्षक कोणत्याही शाळेत बदली करुन पाठवू नका, असे स्पष्ट शब्दात सुनावले. वरुन त्यांनी त्या संस्थेला लेखी नोटीसही बजावली आहे. त्यामुळे त्या शिक्षकाची बदलीची प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आहे. झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी तात्काळ सुचना केल्याने हा निर्णय झाल्याने खिलारी आणि शिक्षणाधिकारी केळेकर यांचे जिल्हावासियांनी आभार मानले. दरम्यान, संबंधित शिक्षकाला सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी होवू लागली आहे.