Tarun Bharat

कोणत्याही यशाला शॉर्टकट नाही!

आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी /बेळगाव

जीवन हे न संपणारे युद्ध आहे. कुठल्याही क्षेत्रात जा.. तुम्हाला संघर्ष हा करावाच लागणार. संत तुकाराम म्हणतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, याचप्रमाणे संघर्षाला सामोरे जाण्याची जीद्द ठेवली तर आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. प्रत्येकजण हा विशेष आहे. फक्त गरज आहे. ती स्वतःमधले कलाकौशल्य शोधण्याची. कधीही लहान स्वप्ने पाहण्यापेक्षा मोठी स्वप्ने पहा. आणि या स्वप्नांच्या मागे धावताना कुठला शॉर्टकट वापरू नका. कारण कोणतेही यश हे शॉर्टकटमुळे मिळत नाही, असे विचार आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांनी मांडले.

जीवनविद्या मिशनतर्फे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या युवा व्याख्यान मालेत ते बोलत होते. कोनवाळगल्ली येथील लोकमान्य रंगमंदीर येथे ही व्याख्यानमाला पार पडली. निंबाळकर यांनी तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात या विषयावर तरुण पिढीला मार्गदर्शन केले.

तरुण वयात बरेचजण भरकटले जातात. याला जबाबदार असते ती संगत, संगतीमुळे आपले विचार, सवयी या घडत असतात. त्यामुळे कोणती संगत करावी हे प्रत्येकाने विचार केले पाहिजेत. सवयीमध्ये बदल करताना थोडेफार त्रास हे होणारच रेल्वेचे रूळ बदलताना थोडी तरी खडबडी ही होतेच. परंतु त्यामुळे बदल त्रासदायक ठरतो. परंतु त्यापुढे नवनिर्मितीचा आनंदही घेता येतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, कौतुक, करूणा व कृतज्ञता या यशस्वी पायऱया असून, जीवनविद्या मिशनने याचा अवलंब करत अनेक विद्यार्थी घडविल्याचे वैभव यांनी नमूद केले.

म्हणून बिहारचे लोक स्पर्धा परीक्षेत अव्वल

बिहार, उत्तरप्रदेश या भागात लहानपणापासूनच विद्यार्थ्यांवर स्पर्धा परीक्षांचे संस्कार केले जातात. स्पर्धा परीक्षा हेच त्यांचे जग हे त्यांच्या मनावर बिंबविले जाते. त्यामुळे त्यांचे मार्गक्रमण हे त्याच दिशेने होत असते. त्यामुळेच बिहारचे लोक स्पर्धा परीक्षेत अव्वल ठरतात असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरूवात विश्व प्रार्थनेने झाली. चंद्रकांत निंबाळकर, शितल गोरे, शंकरराव बांदकर, प्रभाकर देसाई, शिवाजी कागणीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी जीवन विद्या मिशनचे सदस्य व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

वॉकर घेऊन ते कार्यक्रमाला दाखल…

आसाम व मिझोरम या दोन राज्यांच्या सीमेवरून हिंसाचार झाला. जुलै 2021 मध्ये झालेल्या या हिंसाचारात एक गटाकडून तुफान गोळीबार करण्यात आला. सलग 45 मिनिटे धुमश्चक्री सुरू होती. यामध्ये सहा पोलीसांचा मृत्यू झाला तर आसामच्या कचार जिल्हय़ाचे पोलीस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली. ती 45 मिनिटे आयुष्यात कधीही न विसरण्यासारखी असा उल्लेख निंबाळकर यांनी आपल्या भाषणात केला. वैद्यकीय रजा असल्याने वॉकर घेऊन ते या कार्यक्रमाला हजर होते. त्यामुळे टाळय़ांच्या कडकडाटात बेळगावकरांनी त्यांचे स्वागत केले.

Related Stories

पशु संगोपनतर्फे गायी-म्हशींसाठी मिळणार अनुदान

Amit Kulkarni

अश्लील हावभाव-जीवे मारण्याची धमकी देणाऱया तिघांना कारावास

Patil_p

उर्दू स्कूल इंग्रजी स्कूलमध्ये वर्ग करण्यास विरोध

Amit Kulkarni

आतापर्यंत 62 टक्के घरपट्टी मनपाच्या खजिन्यात जमा

Patil_p

गुंजीत आखेर स्वयंघोषित सीलडाऊन, गावातील सर्वच रस्ते बंद

Patil_p

120 विनापरवाना व्यावसायिकांना नोटिसा

Amit Kulkarni