शशिकांत सरदेसाई : उसगांव येथे हिंदवी स्वराज्यतर्फे शिवजयंती
वार्ताहर /उसगांव
तिस्क उसगांव येथील हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्याला प्रमुख वक्ते म्हणून शशिकांत सरदेसाई उपस्थित होते. उसगांव पंचायतीचे पंचसदस्य गोविंद परब फात्रेकर, रेश्मा मटकर, सुचिता गांवस व हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश फात्रेकर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या त्रिसूत्रीचा आपल्या जीवनात अंगीकार करीत छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य मावळ्यांना हाताशी धरून मोगल, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही अशा अनेक परकीय आक्रमकांशी झुंज देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष या देशात होणे नाही असे उद्गार शशिकांत सरदेसाई यांनी काढले. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनिती, युद्धकौशल्य, शौर्य, पराक्रम, राज्यव्यवस्थापन, सत्य, न्याय आणि भविष्य कालीन नियोजन या महाराजांच्या गुणांवर सरदेसाई यांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला.
‘मराठा वॉरियर्स’ या विषयावर छोट्या मुलांनी वेषभूषा स्पर्धेत भाग घेतला. हिंदवी स्वराज्य संघटनेच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मसोहळा ते राज्याभिषेकपर्यंतचा इतिहास उलगडणारा ‘शिवगाथा’ हा नृत्य नाटिकेचा देखणा प्रयोग सादर केला. संहितेचे लेखन समृद्धी सूर्यकांत गांवस याचे तर अजय विष्णू बागकर यांनी दिग्दर्शन केले. नृत्य दिग्दर्शन गितेश नाईक, समृद्धी गांवस व सुनिधी नाईक, ध्वनी संयोजन व संवाद संकलन प्राजक्ता तिळवे, संगीत व संहिता संकलन फणेश्वर फात्रेकर व अंकीत मडकईकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका गितेश नाईक, अफझल खान – तनिष्क बागकर, जिजामाता- सर्वेशा परब, बालशिवाजी- श्रेयश रे•ाr, भवानीमाता- राजलक्ष्मी अगोलकर, पंत- शिवम शिरोडकर, आर्तिकेश नाईक, मावळे – शार्विल शिरोडकर, साईराज सांगोडकर तसेच समृद्धी गांवस, प्राजक्ता तिळवे, सुनिधी नाईक, सुहानी गांवस, सानवी गांवस, शुभ्रा गांवस, प्रणवी नाईक, सिद्धिका रे•ाr, सपना गांवस व दीपाली शिरोडकर यांनी भूमिका सकारल्या. सुनिधी नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सर्वेशा फात्रेकर यांनी आभार मानले.