आमदार गणेश गांवकर यांचे उद्गार
प्रतिनिधी /धारबांदोडा
पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सावर्डे मतदारसंघात विकासाचे विविध प्रकल्प राबविण्याचा आपला प्रयत्न असून सध्या त्या दृष्टीने काम सुरु आहे. येत्या 6 महिन्यात त्याची फलश्रुती दिसून येईल. कुळे पंचायत क्षेत्रात कृषी व्यवसायाला मोठा वाव आहे. याठिकाणी मुबलक पाणी व जमीन उपलब्ध असल्याने कृषी उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेणे शक्य आहे, असे मत पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. गणेश गावकर यांनी मांडले.
कुळे शिगांव पंचायत क्षेत्रातील किसान सभा वाकेकुळण शिगांव शेतकरी संघटनेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. दूधसागर पर्यटन व्यवसायाबद्दल आपण वनखात्य़ाच्या अधिकाऱयांसोबत चर्चा केली असून त्याचा सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येईल. किसान सभा वाकीकुळण संघटनेच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या निवारण केल्या जाणार असून यापूर्वी 2012 मध्ये शेतीसाठी उभारलेल्या पाणी प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुळे शिगांव पंचायतीचे सरपंच मच्छिंद्र देसाई, पंचसदस्य लक्सो डोईफोडे, निलेश सातपालकर, किसान सभेचे अध्यक्ष गोविंद शिगांवकर, उपाध्यक्ष हरिष मामलेकर, सचिव नरेश शिगांवकर, जलस्रोत खात्याचे अभियंते सागर नाईक व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मनरेगा योजनेअंतर्गत शेतीमधील नाला साफ करण्याच्या कामाला आमदार गणेश गावकर यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला.