शॅडो कौन्सिलची मागणी : मुख्याधिकाऱयांना निवेदन, कोलमोरोड येथील घटना
प्रतिनिधी /मडगाव
शॅडो कौन्सिल फॉर मडगावने कोलमोरोड, मडगाव येथे असलेल्या कचऱयासाठीच्या ट्रान्सफर स्टेशनला आग लागण्याच्या घटनेचा पोलिसांमार्फत तपास करून कारवाईची जोरदार मागणी केली आहे. रविवार 6 रोजी पहाटे मडगाव पालिकेच्या अंतर्गत असलेल्या या ट्रान्स्फर स्टेशनला आग लागली, ज्यामुळे पालिकेचे मोठे नुकसान झाले आहे.
यासंदर्भात पालिकेच्या मुख्याधिकाऱयांना सादर केलेल्या निवेदनात शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी या आगीच्या घटनेत पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले कचऱयाचे ट्रान्सफर स्टेशन, जळून गेलेले कचरा संकलनासाठीचे 16 पेक्षा जास्त डबे यामुळे पालिकेला लाखभर रुपयांचे नुकसान झाल्याचे नजरेस आणून दिले आहे.
मडगाव पालिकेच्या कचरा संकलन कंत्राटदाराच्या कामगारांनी सदर ट्रान्सफर स्टेशनचे चुकीच्या पद्धतीने व्यवस्थापन केल्याबद्दल शॅडो कौन्सिलने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आगीच्या घटनेमुळे पालिकेचे केवळ आर्थिक नुकसान झालेले नाही, तर मागील दोन दिवसांपासून कोलमोरोड, रातवाडो इत्यादी भागांतील दैनंदिन कचरा संकलनावर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे येथील रहिवाशांना त्रास होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
आगीच्या घटनेत शासनाने संपादित केलेल्या जमिनीवर डोळा असलेल्या काही बेईमान घटकांचा हात असल्याचा संशय व्यक्त करताना कुतिन्हो यांनी या घटनेची पोलीस चौकशी करण्याची मागणी केली आहे. सध्या तेथे एक मोठे दुकान (फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर) बेकायदेशीरपणे उभारले आहे आणि दुसरे एक उभारले जात आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. या आगीच्या घटनेची पोलीस चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच मडगाव-नावेली चौपदरी रस्त्यालगत संपादित शासकीय जमिनीवर बेकायदेशीररीत्या उभारलेल्या दुकानांवर-बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत पालिकेने मडगाव पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल न केल्याने राजकीय नेते गैरकृत्य करणाऱयांना त्याचप्रमाणे सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणाऱयांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप कुतिन्हो यांनी केला आहे. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांनी सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी योग्य कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.