आरटीआय कार्यकर्ते रॉड्रिगीश यांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबाद्वारे आसगाव येथे चालवल्या जाणाऱया सिली सोल्स कॅफे आणि बारला अबकारी आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यातच त्याचा कथित बेकायदेशीरपणा उघडकीस आला आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे मत आरटीआय कार्यकर्ते आयरीश रॉड्रिगीश यांनी व्यक्त केले आहे.
सदर आस्थापनाच्या संस्थापकांनी आसगाव पंचायत आणि अबकारी अधिकारी यांच्या संगनमताने केलेल्या या कथित फसवणुकीचीही पोलखोल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
गोव्यातील अबकारी नियमांनुसार केवळ अस्तित्वात असलेल्या रेस्टॉरंटलाच बारचा परवाना मिळू शकतो हे खरे असले तरीही अबकारी खात्याने 18 फेब्रुवारी 2021 रोजी कायद्याचे उल्लंघन करून या बारच्या आउटलेटवर भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आणि देशी दारूची किरकोळ विक्री करण्यास परवाना जारी केला होता.
या बारसाठी ज्यांच्या नावे अबकारी खात्याने परवाने जारी केलेल्या अँथनी डिगामा यांना 30 डिसेंबर 2020 रोजी आधारकार्ड जारी करण्यात आले असून त्यात ते मुंबईचे रहिवासी असल्याचे दर्शविते. 1200 चौरस मीटर विस्तीर्ण परिसरात थाटण्यात आलेल्या या आस्थापनासाठी कायद्याचे उल्लंघन करून परवाने जारी करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, दि. 17 मे 2021 रोजी अँथनी डिगामा यांचे निधन झाले. त्यासंबंधी मुंबई महानगरपालिकेने मृत्यूप्रमाणपत्र दिले आहे. तरीही गेल्या दि. 29 जून 2022 रोजी स्थानिक अबकारी कार्यालयाने त्याच अँथनी डिगामा यांच्या नावाने सदर परवान्यांचे नूतनीकरण केले. हे कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे. असे ऍड रॉड्रिगीश यांनी म्हटले आहे.
स्मृती इराणी यांची काँग्रेसला नोटीस
खोटी माहिती पसरवून आपली 18 वर्षीय कन्या आणि एकुणच कुटुंबीयांची बदनामी केल्याबद्दल केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नेट्टा डिसोझा आणि इतरांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. याप्रकरणी या सर्वांनी त्वरित आणि विनाअट आपली लेखी माफी मागावी तसेच सर्व आरोप मागे घ्यावे, अशी मागणी इराणी यांनी केली आहे.