अन्य खात्यांमधून रक्कम मिळविली जाणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जर तुम्ही बँक चेक (धनादेश)चा वापर करत असाल तर हे वृत्त तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. चेक बाउन्स (धनादेश न वटणे) प्रकरणांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी अर्थ मंत्रालय चेक जारी करणाऱया व्यक्तीच्या अन्य खात्यांमधून रक्कम मिळविण्याच्या आणि अशा प्रकरणांमध्ये नवी खाती उघडण्यावर बंदी घालण्यासारख्या पावलांवर विचार करत आहे. चेक बाउन्सच्या वाढत्या घटना पाहता अर्थ मंत्रालयाने अलिकडेच एक उच्चस्तरीय बैठक बोलाविली होती. या बैठकीत अनेक प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
चेक बाउन्ससारख्या प्रकारांमुळे कायदेशीर प्रणालीवरील भार वाढत असतो. याचमुळे कायदेशीर प्रक्रियेपूर्वी चेक जारी करणाऱया व्यक्तीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास त्याच्या अन्य बँक खात्यांमधून रक्कम मिळविण्याचे पाऊल विचाराधीन आहे. याचबरोबर चेक बाउन्सचे प्रकरण कर्जफेडीतील अपयशाप्रमाणे मानून याची माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे संबंधित व्यक्तीचा सिबिल स्कोर कमी होणार आहे.
या सूचना अंमलात आल्यास संबंधित व्यक्तीला चेक वटविण्यास भाग पडणार असून याप्रकरणी न्यायालयात धाव घेण्याची गरज भासणार नाही. तसेच यामुळे व्यावसायिक सुलभता वाढणार असून खात्यात पुरेशी रक्कम नसतानाही जाणूनबुजून धनादेश जारी करण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.
तुरुंगवासाची तरतूद
चेक जारी करणाऱया व्यक्तीच्या अन्य खात्यांमधून रक्कम ऑटो डेबिट करण्यासाठी आदर्श संचालन प्रक्रिया तसेच अन्य सूचना विचारात घ्याव्या लागणार आहेत. चेक बाउन्स प्रकरणी न्यायालयात धाव घेतली जाऊ शकते. याप्रकरणी चेकच्या रकमेच्या दुप्पट दंड किंवा 2 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
चेम्बर ऑफ कॉमर्सची मागणी
उद्योग संघटना पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने अलिकडेच अर्थ मंत्रालयाला चेक बाउन्सप्रकरणी बँकेतून रक्कम काढण्यावर काही दिवसांची अनिवार्य बंदीसारखे पाऊल उचलण्याची विनंती केली होती. यामुळे चेक जारी करणाऱया व्यक्तीला उत्तरदायी ठरविता येणार असल्याचे संघटनेचे म्हणणे होते.