आजची बैठक निष्फळ: दोन दिवसांनी पुन्हा बैठक : ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम
प्रतिनिधी/सरवडे
काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे सोळांकूर गावात सुरू झालेले काम ग्रामस्थांनी चार दिवसापूर्वी बंद पाडले. हे काम सुरु होण्याच्या दृष्टीने महापालिका व सोळांकूर ग्रामस्थ यांच्यामधे आज बैठक झाली. परंतु योग्य तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली. दोन दिवसांनी पुन्हा बैठक घेतली जाणार असून ग्रामपंचायतीने महापालिकेस मागण्यांचे निवेदन दिले आहे. मागण्या मान्य केल्या तरच काम सुरू करण्यास मान्यता देण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
थेट पाईपलाईनच्या सोळांकूर गावात सुरू असलेल्या ३६ मीटरच्या कामात सहा घराच्या भिंतींना तडे गेले. यामुळे लोकांनी मुख्य रस्त्यावरून पाईप घालूच नये असा आग्रह धरत चार दिवसापूर्वी काम बंद पाडले. या मुख्य रस्त्यावर सहा महिन्यापूर्वी पाच फूट भरावा करून त्यावर सुमारे दोन ते अडीच फुटाचे आरसीसी रस्ता केलेला होता. थेट पाईप साठी आरसीसी रस्ता ब्रेकरने फोडून काम सुरु केले होते. ब्रेकरच्या हादर्याने यांच्या घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे लोकांच्यात संतापाची लाट उसळली. परंतु महापालिकेने चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आज बैठक बोलावली होती. या बैठकीत समाधानकारक मार्ग न निघाल्याने पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.
यावेळी ग्रामपंचायतीने रस्ता ब्रेकरने फोडू नये, पाईप घातलेला रस्ता पाठोपाठ पूर्ण करावा, पाईपलाईन मार्गाजवळील घरांचे स्टरक्चर आँडीट करून घरांचे व्हँल्युशन करावे, घरांच्या नुकसानी पोटी ५ कोटी रुपये अनामत ग्रामपंचायतीकडे ठेवावी, भविष्यात होणार्या नुकसानी बाबत ग्रामपंचायत व महापालिका यांच्यात करार व्हावा अशा मागण्यांचे महापालिकेस निवेदन दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत सरपंच आर. वाय. पाटील, संतोष पाटील, एस टी पानारी, अमित पाटील, राजेंद्र मांजरेकर, शोभा गुरव , सुमन पाटील, अंजना कारेकर, बळवंत शिंदे, राजलक्ष्मी नारकर,मारुती मुधोळकर, ए. टी. पाटील, विश्वास पाटील, प्रकाश ढोकरे, मुकुंद पानारी, श्रीकांत पानारी, तानाजी तोरस्कर, विलास धावरे, शिवानंद महाजन व इतर ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. बी. इंगवले, शाखा अभियंता एस. के. किल्लेदार, महानगरपालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे, जीकेसी कंपनीचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून आपल्या भावना वरिष्ठांना कळवल्या जातील असे सांगितले.