हणजूण पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /म्हापसा
हणजूण पोलिसांनी आसगाव बार्देश येथे रु. 12 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी मूळ पश्चिम बंगालच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये विश्वजीत गौर असे संशयित चोरटय़ाचे नाव आहे.
म्हापसा उपविभागीय अधिकारी उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहबूब मुल्ला यांनी याप्रकरणी हणजूण पोलिसात तक्रार दाखल केली होती. 18 सप्टेंबर 2022 रोजी काही अज्ञात व्यक्तीने आसगाव येथे असलेल्या त्यांच्या व्हिलाचा दरवाजा तोडून सुरक्षित लॉकरमधून 12 लाख रुपयांची रोकड चोरून नेली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली आणि महिला उपनिरीक्षक स्नेहा सावळ, हवालदार अजिंक्य घोगळे, रुपेश आजगावकर, हेमंत मातोंडकर यांचा समावेश करून एक पथक तयार करण्यात आले आणि तपासादरम्यान जमिनीवर काही रक्ताच्या खुणा दिसल्या. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून तक्रारदाराच्या सर्व कर्मचाऱयांची चौकशी करण्यात आली आणि शेवटी एका कर्मचाऱयावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता वरील रोख रक्कम त्यानेच चोरी केल्याचे उघड झाले. म्हणून सदर कर्मचारी विश्वजीत गौर (वय 20) कोलकाता पश्चिम बंगाल याला कलम 457, 380 आयपीसी अंतर्गत अटक करण्यात आली. पुढील कसून चौकशी केल्याने रु. 12 लाख चोरल्याचे त्यांनी सांगितले. गुह्याची नोंद झाल्यानंतर अवघ्या 12 तासात हणजूण पोलिसांनी त्वरित कारवाई केली. पुढील तपास निरीक्षक प्रशल देसाई, म्हापसा उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक स्नेहा सावळ करीत आहे.