प्रतिनिधी/रत्नागिरी
कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनमध्ये प्रवाशांचा मोबाईल चोरी करणाऱ्याला शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली. दत्तात्रय शिवाजी गोडसे (21, रा. ता. सांगोला, जिल्हा सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे.गुरूवारी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत सखाराम खांबल (57, ऱा नवी मुंबई) यांनी मोबाईल चोरी झाल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार खांबल हे 26 जुलै 2022 रोजी मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करत होते. रात्री 11 च्या सुमारास त्यांचा चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरीला गेला. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासामध्ये हा मोबाईल दत्तात्रय गोडसे याने चोरल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 6 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.