वृत्तसंस्था/ बॅस्टड, स्वीडन
ऑस्ट्रियाच्या माजी जागतिक तृतीय मानांकित डॉमिनिक थिएमने 14 महिन्यांतील पहिला सामना जिंकत येथे सुरू असलेल्या बॅस्टड ओपन टेनिस स्पर्धेत दुसरी फेरी गाठली.
मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला गेल्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद राखता आले नव्हते. गेल्या वर्षी मेमध्ये त्याने रोममधील स्पर्धेच्या दुसऱया फेरीत शेवटचा विजय मिळविला होता. त्यानंतर मनगटाच्या दुखापतीमुळे त्याला नऊ महिने टेनिसपासून दूर रहावे लागले होते. त्यामुळे त्याची मानांकनातही 339 स्थानापर्यंत घसरण झाली. येथील सामन्यात त्याने फिनलँडच्या एमिल रुसुवोरीवर 3-6, 6-1, 7-6 (7-5) अशी मात केली. त्याची पुढील लढत स्पेनच्या चौथ्या मानांकित रॉबर्टो बॉटिस्टा ऍगटशी होईल. त्याला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.