प्रतिनिधी/ बेळगाव
भरपावसातही चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. महावीरनगर उद्यमबाग येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे लाखाचा ऐवज लांबविला आहे. शनिवारी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली असून उद्यमबाग पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. मूळचे ब्रह्मनगरचे, सध्या महावीरनगर येथे राहणाऱ्या संजय रामचंद्र भोसले यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. मंगाई यात्रेनिमित्त ते आपल्या कुटुंबीयांसह 31 जुलै रोजी वडगावला गेले होते. पाहुण्यांकडे त्यांचा मुक्काम होता. या काळात रोज महावीरनगर येथील घरी ते येऊन जात होते.
शुक्रवार दि. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी संजय हे आपल्या घरी येऊन गेले. त्यानंतर मध्यरात्री कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील सुमारे 9 ग्रॅम सोने, 30 तोळे चांदी, 15 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे लाखाचा ऐवज पळविला आहे. घटनेची माहिती समजताच उद्यमबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शनिवार दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वा. संजय वडगावहून आपल्या घरी परतले. त्यावेळी दरवाजा उघडा होता. आपली छबी सीसीटीव्हीत कैद होऊ नये म्हणून चोरट्याने आधी कॅमेऱ्यावर कपडा टाकून नंतर कॅमेऱ्याची वायर तोडल्याचे उघडकीस आले आहे. उद्यमबागचे पोलीस उपनिरीक्षक किरण होनकट्टी पुढील तपास करीत आहेत.