वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या आठवडय़ात हैद्राबादयेथे पार्टीहून परतणाऱया एका अल्पवयीन युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तिसऱया आरोपीला अटक केली आहे. याआधी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या चौकशीत या तिसऱया आरोपीचा ठावठिकाणा समजला. पाच आरोपींची ओळख आतापर्यंत उघड झाली असून त्यातील चार अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाला राजकीय रंगही मिळाला आहे. एक अल्पवयीन आरोपी सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाच्या नेत्याचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्याचे आणि त्याच्या वडिलांचे नाव घोषित करण्यात आलेले नाही. आणखी दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके निर्माण करण्यात आली आहेत.
सीबीआयकडे देण्याची सूचना
हे प्रकरण सीबीआयडे सोपवावे, अशी मागणी तेलंगणा भाजप अध्यक्ष बांदी संजय यांनी केली आहे. प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे निकटचे नातेवाईक असल्याने राज्यातील पोलीस विश्वासार्ह चौकशी करू शकणार नाहीत. त्यामुळे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आरोपींचा संबंध कोणाशीही असला तरी त्यांना दयामाया दाखविण्यात येणार नाही, असे आश्वासन तेलंगणाचे गृहमंत्री महंमद अली यांनी शनिवारी दिले आहे.
सीसीटीव्हीच्या फुटेजवरून आरोपींचा मागोवा घेण्यात येत आहे. सर्व आरोपींवर भारतीय दंड विधानाच्या अनुच्छेद 376डी, पोक्सो कायद्याचा अनुच्छेद 5 आणि 6 तसेच भारतीय दंड विधान 323 अनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.