21 वर्षांपर्यंत पत्नीच्या पार्थिवासोबत राहिला , कधी बोलायचा तर कधी जवळ पडून राहाचा
एक 72 वर्षीय व्यक्ती स्वतःच्या पत्नीच्या पार्थिवासोबत 21 वर्षांपर्यंत राहिला आहे. तो एका खोलीच्या घरात पत्नीच्या पार्थिवाला शवपेटीत ठेवून राहत होता. पत्नीच्या मृत्यूनंतरही तिच्यापासून वेगळे होण्याची तो कल्पना करू शकत नव्हता. अशा स्थितीत त्याने पत्नीच्या पार्थिवाला घरातच दफन केले आहे.
या व्यक्तीच्या पत्नीबद्दलच्या प्रेमाला काही जण ‘अमर प्रेमा’ची उपमा देत आहेत. तर काही जण ‘अंतहीन प्रेम करणारा व्यक्ती’ असे त्याला संबोधित आहेत. अलिकडेच या व्यक्तीने पत्नीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आहेत. हमसून रडत पत्नीला अखेरचा निरोप देताना या व्यक्तीची छायाचित्रे समोर आली आहेत.
72 वर्षीय व्यक्तीचे नाव चार्न जनवॉचक्कल असून तो थायलंडच्या बांग खेन जिल्हय़ाचा रहिवासी आहे. थायलंडच्या सैन्यात डॉक्टर राहिलेले चार्न हे स्वतःच्या पत्नीवर भरपूर प्रेम करायचे. अशा स्थितीत जेव्हा पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी तिच्या पार्थिवाला दफनभूमीत दफन करण्याऐवजी घरातच दफन केले. त्यांच्या पत्नीचा मृत्यू आजारपणामुळे झाला होता.
या घटनेनंतर चार्न यांचे दोन्ही पुत्र घर सोडून गेले हेत. परंतु चार्न यांना याचा फरक पडला नाही आणि त्यांनी शव घरातच दफन केला. ते कधी शवाजवळ जात बोलत बसायचे तर कधी तेथेच झोपी जायचे. परंतु 21 वर्षांनी मागील महिन्यात चार्न यांनी पत्नीवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एका संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या मदतीने त्यांच्या पत्नीच्या मृतदेहाच्या अवशेषांना बाहेर काढत विधिवत अखेरचा निरोप देण्यात आला.
चार्न हे उच्चशिक्षित असून त्यांच्याकडे अनेक पदव्या आहेत. परंतु पत्नीच्या मृत्यूनंतर ते अत्यंत सामान्य जीवन जगत आहेत. त्यांच्या घरात वीज देखील नाही. परंतु पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आलयावर त्यांना अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आपल्या मृत्यूनंतर पत्नीला कुणीच योग्य सन्मान देणार नसल्याच्या भीतीतून चार्न यांनी पत्नीवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता.