उत्तर प्रदेश विधानपरिषदेत घडला नवा इतिहास
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात विधानपरिषदेची स्थापना होऊन 135 वर्षांचा कालावधी लोटला आहे. तथापि, प्रथमच असे घडत आहे, की या विधानपरिषदेत काँग्रेसचा एकही सदस्य नाही. बुधवारी काँगेसचे एकमेव सदस्य दीपक सिंग हे निवृत्त झाल्यामुळे आता काँगेसचा एकही सदस्य या सभागृहात उरलेला नाही.
उत्तर प्रदेशची विधानपरिषद 5 जानेवारी 1887 या दिवशी स्थापन झाली. या विधानपरिषदेची पहिली बैठक 8 जानेवारी 1887 या दिवशी झाली. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक वेळी काँगेसचा सदस्य या विधानपरिषदेत होता. पण बुधवारी मात्र हे सभागृह ‘काँगेसमुक्त’ झाल्याची घटना घडली आहे.
10 सदस्य निवृत्त
बुधवारी या सभागृहातून 10 सदस्य निवृत्त झाले. यांपैकी जगजीवन प्रसाद, बलराम यादव, डॉ. कमलेश कुमार पाठक, रणविजय सिंग, रामसुंदर निषाद आणि शत्रुद्ध प्रकाश हे समाजवादी पक्षाचे होते. अतर सिंग राव, सुरेश कुमार काश्यप आणि दिनेशचंद्र हे बसपचे सदस्यही निवृत्त झाले. भारतीय जनता पक्षाचे केशव प्रसाद मौर्य आणि चौधरी भूपेंद्रसिंग हेही निवृत्त झाले. मात्र या दोघांची फेरनिवड यापूर्वीच झाली असल्याने त्यांचे सदस्यत्व राहिले आहे. यांपैकी केशव प्रसाद मौर्य हे उपमुख्यमंत्री आहेत. तर चौधरी भूपेंद्रसिंग हे मंत्री आहेत.
काँगेसचा ऱहास
एकेकाळी काँगेसचे या सभागृहात बहुमत होते. आता या पक्षाचा पुरता ऱहास झाला असून विधानपरिषदच नव्हे, तर विधानसभेतही या पक्षाला मोठा फटका बसला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँगेसचे आतापर्यंतचे सर्वात कमी, म्हणजे केवळ दोन सदस्य निवडून आले आहेत. तसेच या पक्षाला मतेही आतापर्यंतची सर्वात कमी म्हणजे केवळ 2.33 टक्के मते मिळालेली आहेत.