हतबलतेमुळे शिक्षक झाला डिलिव्हरी बॉय : कहाणी जाणून लोकांनी मिळवून दिली बाइक
इंटरनेटची शक्ती कमाल आहे, याच्यामुळे एखादा व्यक्ती एका रात्रीत स्टार होतो, तर गरजूंना लाखोंची मदत मिळते. शिक्षकापासून डिलिव्हरी बॉय झालेल्या एका 31 वर्षीय व्यक्तीची कहाणी इंटरनेटवर व्हायरल झाल्यावर दानशूर लोकांनी त्याची कठोर मेहनत पाहून 24 तासांमध्ये त्याला एक दुचाकी मिळवून दिली आहे. या डिलिव्हरी बॉयचे छायाचित्र आणि कहाणी ट्विटर युजर आदित्य शर्माने 11 मार्च रोजी शेअर केले होते.
मला वेळेत ऑर्डर मिळाली, परंतु माझ्यासाठी आश्चर्याची बाब म्हणजे डिलिव्हरी बॉय सायकलवर आला होता. माझ्या शहराचे तापमान सुमारे 42 अंश सेल्सिअस होते. राजस्थानच्या अंग भाजून काढणाऱया उन्हात त्याने माझी ऑर्डर वेळेत पोहोचविली. त्याचे नाव दुर्गा मीना असून तो दोन चार महिन्यांपासून डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोय असे आदित्यने नमूद केले.
दुर्गा शिक्षक राहिला असून कोरोना काळात त्याला नोकरी गमवावी लागली होती. आर्थिक स्थितीमुळे त्याला पुढील शिक्षण घेणे अशक्य ठरल्याने डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तो दुचाकी विकत घेण्यासाठी पैसे जमवत होता.
दिवसाला 10-12 डिलिव्हरी सायकलने करताना त्याची दमणूक व्हायची ही व्यथा मांडत आदित्यने त्याच्याकरता 75 हजार रुपये जमविण्यासाठी इंटरनेटवर साद घातली. त्याच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि सुमारे 2 लाख रुपये जमा झाले. आदित्यने या पैशांमधून दुर्गाला 24 तासांपेक्षा कमी वेळेत दुचाकी भेट केली आहे. तसेच आदित्यने यापुढे पैसे पाठवू नका असे आवाहन केले आहे.