प्रतिनिधी /वास्को
वास्को शहरातील संभाजीनगरचा राजा हा एकवीस दिवसांचा गणपती आकर्षक पध्दतीने सजवण्यात आलेला आहे. दरवर्षी विविध वस्तूंचा वापर करून तयार करण्यात येणारा गणपती यंदा काच वापरून तयार करण्यात आलेला आहे. ही भव्य मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी पडत आहे.
नॉन मॉन वास्को या भागात शांतादुर्गा कला क्रीडा संघातर्फे संभाजीनगरचा राजा म्हणून ओळखला जाणारा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशोत्सवात दरवर्षी विशिष्ठ प्रकारची भव्य गणेश मूर्ती संघाच्या कार्यकर्त्यांकडूनच बनवली जाते. यंदा गणेशमूर्तीसाठी काच वापरण्यात आलेली आहे. त्यामुळे श्रीगणेशाची ही मूर्ती चकाकत आहे. दरवर्षी प्रमाणे या मंडळाने रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दि. 15 रोजी दुपारी महाप्रसाद, दि. 16 रोजी संध्याकाळी कराओको कार्यक्रम, दि. 17 रोजी सकाळी अखिल गोवा रांगोळी स्पर्धा, दि. 18 रोजी सकाळी शालेय मुलांसाठी मुरगाव तालुका मर्यादीत चित्रकला स्पर्धा, दि, 19 रोजी रात्री देणगी कुपनांचा निकाल व दि. 20 रोजी संध्याकाळी श्री गणेशमूतींचे भव्य मिरवणुकीने विसर्जन करण्यात येईल.