सलामीच्या लढतीत जर्मनीवर 5-0 फरकाने एकतर्फी मात
वृत्तसंस्था/ बँकॉक
भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने थॉमस चषक मोहिमेची विजयी सुरुवात करताना रविवारी गट क मधील पहिल्याच लढतीत जर्मनीचा 5-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला.
विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविणाऱया लक्ष्य सेनने मोहिमेला सुरुवात करताना जागतिक क्रमवारीत 64 व्या स्थानावर असणाऱया मॅक्स वीसकिरचेनचा 21-16, 21-13 असा सहज पराभव केला. त्यानंतर दुहेरीत सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी विजयासाठी तीन गेम्समध्ये संघर्ष करावा लागला. त्यांनी जोन्स राल्फी व मर्विन सीडेल यांच्यावर 21-15, 10-21, 21-13 अशी मात केली. सुमारे एक तास ही लढत रंगली होती. जागतिक अकराव्या मानांकित किदाम्बी श्रीकांतने तिसऱया सामन्यात काइ शाफरवर 18-21, 21-9, 21-11 अशी मात करीत भारताची आघाडी 3-0 अशी केली. दुहेरीच्या चौथ्या सामन्यात एमआर अर्जुन व धुव कपिला यांनी बार्न गीज व जॅन कॉलिन व्होल्कर यांचा 25-23, 21-15 असा पराभव केला तर शेवटच्या सामन्यात एचएस प्रणॉयने मथायस किक्लिट्झचा 21-9, 21-8 असा धुव्वा उडवत ही लढत 5-0 अशी एकतर्फी जिंकून दिली.
भारतीय पुरुष संघाला या स्पर्धेत अद्याप एकदाही पदक जिंकता आलेले नाही. पण यावेळी ती कसर भरून काढण्याच्या प्रयत्नात भारताने चांगली सुरुवात केली आहे. भारताच्या एकाही संघाला आतापर्यंत या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. गेल्या वर्षी भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. उबेर चषकात महिला संघाची सलामीची लढत कॅनडाविरुद्ध होणार आहे.