वृत्तसंस्था/ सिडनी
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर 12 फेरीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर शानदार विजय मिळविल्यानंतर भारतीय संघ नेदरलँड्सविरुद्ध होणाऱया दुसऱया सामन्याची तयारी करीत असून मंगळवारी विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल यांनी फलंदाजीचा कसून सराव केला. पण हार्दिक पंडय़ा व जलद गोलंदाजांनी या सराव सत्रात भाग घेतला नाही.
मंगळवारी भारतीय संघ पहिल्या सराव सत्रासाठी सिडनी क्रिकेट मैदानात सकाळी उतरला होता. जाळय़ातील सरावावेळी कर्णधार रोहित शर्मा आत्मविश्वासपूर्वक खेळताना दिसला. भारतासाठी लकी असलेल्या एससीजीवर चेसमास्टर कोहली व सलामीवीर केएल राहुल यांनीही नेट सेशनमध्ये फलंदाजीचा सराव करीत आनंद लुटला. या सत्रावेळी फलंदाज व गोलंदाज दोघेही आपले कौशल्य वाढविण्यासाठी कठोर सराव करताना दिसून आले. या सत्रात राहुल व दिनेश कार्तिक यांनी रविचंद्रन अश्विन व यजुवेंद्र यांच्या फिरकीला सामोरे गेले. कार्तिकने कोहलीसमवेतही थ्रोडाऊनी केले. प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड व फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या देखरेखीखाली सर्वांनी सराव केला.
राहुल व रोहित यांनी ड्राईव्ह मारण्यावर भर दिला होता. त्यात ते चांगल्या टचमध्ये दिसून आल्याने त्यांच्या फॉर्मबद्दल संघ व्यवस्थापनाला वाटणारी चिंता काहीशी कमी झाली आहे. रविवारी पाकविरुद्ध रोहित शर्माला मोठे योगदान देता आले नाही. त्याने आज जास्त वेळ फलंदाजीच्या सरावावर भर दिला. सध्या सिडनीत रहिवासी असणारा पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद इरफान ज्युनियरचा नेटबॉलर म्हणून उपयोग करण्यात आला. त्याच्या वेगवान गोलदांजीवर रोहित व कोहली दोघेही प्रभावित झाले. रोहितने तर त्याला सेल्फी घेण्याची संधी दिली आणि त्याला भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
रिषभ पंतही काही ठरावीक फटक्यांचा नेटमध्ये सराव करताना दिसला. मात्र सूर्यकुमार यादव व हार्दिक पंडय़ा यांनी विश्रांती मिळावी यासाठी सरावात भाग घेतला नाही. गोलंदाजांनीही ठरावीक टप्प्यावर चेंडू टाकण्याचा सराव केला. त्यात चहल व अश्विन यांचा समावेश होता. मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, भुवनेश्वर, अर्शदीप सिंग यांनीही सरावात भाग न घेण्याचा निर्णय घेतला. भारताचा दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध गुरुवारी 27 रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे.