Tarun Bharat

ज्यांना सर्व काही दिले, तेच पक्षावर उलटले

हिम्मत असेल तर गद्दारांनी राजीनामा द्यावा-आदित्य ठाकरे यांचा मल्हारपेठच्या सभेत घणाघात

प्रतिनिधी/ `नवारस्ता, मल्हारपेठ

आसामला महापूर आला असताना आपद्ग्रस्त जनतेला मदत करायची सोडून गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये मौजमजा करणारे शिवसैनिक असूच शकत नाहीत. गुवाहाटी, गोवा येथे मौजमजा करणारे, धांगडधिंगा घालणारे बंडखोर शिवसैनिक नसून ते गद्दारच आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात आता त्यांची गद्दार अशी कायम नोंद राहणार आहे. ज्यांना सर्व काही दिले, तेच पक्षावर उलटले. या गद्दारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी असताना गद्दारीचा खेळ खेळला. त्यांनी बंड किंवा उठाव केलेला नसून गद्दारीच केली आहे. या 40 गद्दारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान शिवसेना नेते तथा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या 40 आमदारांना दिले.

निष्ठा यात्रेनिमित्त सातारा जिह्यातील मल्हारपेठ (ता. पाटण) येथे झालेल्या जाहीर  सभेत बोलत होते. दरम्यान, तरीही मातोश्रीचे दरवाजे सर्वांना आजही खुले असल्याचे आवाहनही आमदार ठाकरे यांनी बंडखोरांना केले. खासदार विनायक राऊत, आदेश बांदेकर, माजी आमदार दगडूदादा सपकाळ, सदाशिव सपकाळ, आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे -पाटील, जिल्हा प्रमुख हर्षद कदम, यशवंत घाडगे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख छाया शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, राज्यात सध्या महाराष्ट्रात गद्दारांचे सरकार असून हे  दोन लोकांचे जम्बो मंत्रिमंडळ आहे. यामध्ये मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण, हे कळत नाही. यातील नेते कुणाला पंतप्रधान म्हणत आहेत, काहीच समजत नाही. गद्दार हा गद्दारच असतो. त्यांनी हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे. आम्ही ज्यांना शिवसैनिक समजून प्रेमाने मिठी मारली, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. गद्दारांनो वार कधी पाठीत करायचा नसतो तर तो छातीवर करायचा असतो. आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेल्या विकासकामांना बेकायदेशीर ठरवून गद्दारांच्या सरकारने स्थगिती  दिली. हे सरकार एक दीड महिन्यात कोसळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अशी गद्दारी कधीच खपवून घेणार नाही.

    शिवसेना पक्ष प्रमुख आजारी असताना

उद्धव साहेबांना सांभाळून घ्यायची वेळ होती, त्यावेळी तुम्ही निर्लज्जपणे निघून गेला. आम्ही डोळे बंद करून मिठी मारली. पण तुम्ही पाठीत खंजीर खुपसलात हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. मग बघू सत्य जिंकते की सत्ता जिंकते, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.

लायकीपेक्षा जास्त दिल्याने त्यांचे अपचन..!

मी कधी कुणा आमदाराला मला साहेब म्हणा. माझ्या पाया पड़ा. मी आलो की उठून उभे राहा, असे कधीच सांगितले नाही. मंत्री म्हणून कधीच वागलो नाही. ज्या शिवसैनिकांनी भगवा झेंडा हाती घेतला, त्याच्यासाठी काम करत राहिलो. जनतेसाठी काम केले. महाराष्ट्राच्या राजकारणात लोक इकडे-तिकडे जात असतात. भूक, आकांक्षेपोटी हे होत असते, परंतु आता जे झाले, ते घाणेरडे राजकारण आहे. या 40 बंडखोरांनी राजकारणाला बदनाम करून सोडले आहे. त्यामुळे मी माझी भूमिका जनतेपर्यंत मांडण्यासाठी दौरा करत आहे. मतं मागण्यासाठी माझा दौरा नसून जनतेला वस्तुस्थिती समजावून सांगण्यासाठी आहे. अन्यथा चांगले लोक राजकारणात येणार नाहीत. आता आमदारांबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो जनतेने घ्यायचा आहे. लायकीपेक्षा जास्त दिल्याने त्यांना अपचन झाले म्हणूनच  त्या 40 गद्दारांनी माणुसकी संपवली आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

दगडूदादांचा शंभूराज यांच्यावर हल्लाबोल

या सभेत शिवसेनेचे माजी आमदार दगडूदादा सपकाळ आणि माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांनी पाटण मतदार संघाचे आमदार आणि माजी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल चढविला. शंभूराजे ‘हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, ही तुमची शेवटची विधानसभा आहे’ ठाकरे कुटुंबावर बोलण्याची तुमची लायकी नाही, असा आरोप आमदार शंभूराज देसाई यांच्यावर करून हल्लाबोल चढविला. ज्यांना प्रेमापोटी निवडून दिले, त्यांचा बोलविता धनी कोण आहे? कुणाच्या दावणीला कोण बांधलंय? आणि यामागे अण्णाजी पंतांचे डोके आहे, असा टोला सपकाळ यांनी बंडखोर आमदारांसहित माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

सभेपूर्वी चार तास उत्साहाचे वातावरण

निष्ठा यात्रेच्या निमित्ताने मल्हारपेठ येथे शिवसैनिकांनी जल्लोषपूर्ण व उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. तालुक्यातील गावागावातून शिवसैनिक बहुसंख्येने दुपारी बारा वाजल्यापासून जमायला सुरूवात झाली. मल्हारपेठच्या शिवाजी चौकात सर्वत्र भगवे झेंडे लावले होते. जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केलेल्या आवाहनास शिवसैनिकांनी भरभरून प्रतिसाद देत बहुसंख्येने उपस्थिती दाखवली होती. ठाकरे मल्हारपेठला येण्यापूर्वी चार तास अगोदरच उत्साहपूर्ण वातावरण होते.

Related Stories

शिष्यवृत्तीत सातारा जिल्ह्याचा राज्यात पॅटर्न

Archana Banage

सांगली शहरात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

Archana Banage

बॅरिगेटस्मुळे कराड शहरात भुलभुलैय्या

Amit Kulkarni

जिल्हा सिमेवरील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशाची गरज

Archana Banage

Maharashtra HSC Result 2021: बारावीच्या निकालासाठी मूल्यमापन पद्धत जाहीर

Archana Banage

ड्रग्जप्रकरणी शाहरुखच्या मुलाला एक दिवसाची एनसीबी कोठडी

Archana Banage