सातारा पालिका इमारत खोदकामात आढळल्या रायफलीच्या गोळया
प्रतिनिधी/ सातारा
पालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाकरता पाया खोदण्याचे काम सदरबझार येथील कल्याणी परिसरात सुरु आहे. तेथे खोदकाम करत असताना जेसीबीच्या दाताला एक लोखंडी बॅरलवजा वस्तू लागली. त्यामध्ये एक हजारहून अधिक रायफलीच्या जुन्या गोळय़ा आढळून आल्या. ही बाब सातारा शहर पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली असून या सापडलेल्या रायफलीच्या गोळय़ा पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सातारा पालिकेच्या नूतन इमारतीचे काम कल्याणी परिसरात सुरु आहे. त्याकरता पायाचे खोदकाम गेल्या 20 दिवसांपासून जेसीबीच्या सहाय्याने सुरु आहे. तेथे खोदकामात निघालेले गौणखनिज हे डंपरमध्ये भरुन हुतात्मा स्मारक येथे टाकण्यात येत आहे. काम जोमाने सुरु आहे. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने खोदत असताना जेसीबीच्या दाताला एक लोखंडी छोटय़ा बॅरलवजा वस्तू लागली. तेव्हा जेसीबी चालकाने सावकाशपणे ती वस्तू बाहेर काढली. त्यामध्ये रायफलीच्या सुमारे एक हजारहून अधिक गोळय़ा व इतर गंजलेले साहित्य आढळून आले. या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना काम करणाऱया कामगारांनी दिली. तसेच सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनाही याची माहिती दिली.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या सुचनेनुसार लगेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे हे घटनास्थळी कर्मचारी घेऊन पोहोचले. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक मुसळे, हवालदार भवारी, पोलीस नाईक चव्हाण, पोलीस शिपाई जाधव यांचा समावेश होता. त्यांनी त्या गोळय़ा ताब्यात घेतल्या असुन अजून काही हाती येते काय याची तपासणी करत आहेत. दरम्यान, या गोळय़ा कोणत्या कालावधीतील असू शकतील याच्या तपासासाठी या गोळय़ा पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांनी सांगितले.
सर्व गोळय़ा गंजलेल्या
आढळून आलेल्या सर्व गोळय़ा या गंजलेल्या अवस्थेतील असून त्याचबरोबर जे साहित्य आढळून आले तेही सर्व गंजलेल्या स्थितीत आहे. फक्त या गोळय़ा वजनाने जड असून पुरातत्व विभागाचे अधीक्षक प्रवीण शिंदे यांना अजूनही त्या गोळय़ाबाबत काही माहिती नसल्याचे समजते.