विनोद चिखलकर / ज्योतिबा डोंगर
महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्री महायात्रा अवघी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. दर्शनासाठी हजारो भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत. दर्शनाबरोबरच धार्मिक विधी, अभिषेक, गुलाल-खोबरे उधळणे आणि नैवेद्यासाठी भक्तांची झुंबड उडाली आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर व डोंगर परिसराची जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, देवस्थान समितीचे शिवराज नायकवडे, तहसीलदार रमेश शेडगे, प्रांत अमित माळी यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी काही सूचना व मार्गदर्शन केले. सर्व शासकीय यंत्रणा चैत्र यात्रा संपन्न करण्यासाठी नियोजन करत आहे. यासाठी शासकीय अधिकाऱयांच्या तीन आढावा बैठका झाल्या. डोंगर परिसरात जागा मिळेल तिथे भाविक ठाण मांडून आहेत. भाविकांना पिण्याच्या पाण्यासह अनेक सेवा सुविधा शासनाला पुरवाव्या लागतात.
दख्खनचा राजा ज्योतिबाची गुरुवारी सुवर्णालंकारित आकर्षक महापूजा बांधण्यात आली होती. ही पूजा मधुकर सांगळे, राजाराम बनकर, महादेव झुगर, निलेश फुकटे, बंडा फुकटे यांनी बांधली होती.