दररोज मान्यवरांचे होणार मार्गदर्शन : 14 ते 17 दरम्यान होणार मोहीम
प्रतिनिधी /बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नेतृत्वाखाली 14 ते 17 मे दरम्यान मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. विशाळगड ते पन्हाळगडमार्गे पावनखिंड अशी मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेसाठी शुक्रवारी रात्री बेळगाव, खानापूर, निपाणी येथून हजारो शिवभक्त वाहनांनी विशाळगडला रवाना झाले.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे मोहीम होऊ शकली नाही. यावषी कोरोनाचे निर्बंध दूर झाल्यानंतर विशाळगड ते पन्हाळगड मोहीम आखण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी, अध्यक्ष रावसाहेब देसाई, मोहिमेचे सरसेनापती अशोकराव विरकर यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेला सुरुवात होणार आहे. शनिवार दि. 14 रोजी सकाळी 10 पर्यंत विशाळगड येथील गजापूर गावात शिवभक्तांनी जमायचे आहे. सकाळी 11 वा. विशाळगडावरील बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या मूर्तींचे पूजन करून मोहिमेला सुरुवात होईल.
दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मोहीम आयोजित केल्याने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश येथून हजारो शिवभक्त मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. बेळगावमधील कार्यकर्त्यांनी मागील काही दिवसांपासून मोहिमेसाठी जय्यत तयारी केली होती. शिवप्रतिष्ठानतर्फे नावनोंदणीही करण्यात आली. शुक्रवारी रात्री बेळगाव तसेच खानापुरातील हजारो शिवभक्त मोहिमेसाठी रवाना झाले. शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या नेतृत्वाखाली शिवभक्त विशाळगडला रवाना झाले.
भिडे गुरुजींचे मार्गदर्शन
मोहिमेत शिवभक्तांचे प्रबोधन व्हावे यासाठी प्रत्येक दिवशी विविध मान्यवर विचारमंथन करणार आहेत. 14 रोजी पांडुरंगशास्त्री बलकवडे, 15 रोजी समीर दरेकर, 16 रोजी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ तर 17 रोजी हभप बंडातात्या कराडकर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शिवप्रेमींना संभाजीराव भिडे गुरुजींचे विचार ऐकता येणार आहेत.