नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने आतापर्यंत 4,999 युटय़ूब लिंक्स ब्लॉक केल्या आहेत, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने राज्यसभेत एका लेखी उत्तराद्वारे दिली आहे. शुक्रवारी हे उत्तर प्रश्नोत्तर तासात सादर करण्यात आले. ब्लॉक करण्यात आलेल्या लिंक्समध्ये अनेक युटय़ूब चॅनेल्स आणि व्यक्तीगत युटय़ूब व्हिडीओंचा समावेश आहे. त्यांना ब्लॉक करण्याचा आदेश माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. मात्र न्यायालयाने ज्या वाहिन्यांसंबंधी आदेश दिलेला आहे, त्यांच्या लिंक्स बंद करण्यात आलेल्या नाहीत. 10 मार्चपर्यंत 974 सोशल मिडिया युआरएलस्, अकौंटस्, वाहिन्या, पेजेस, ऍप्स, वेब पेजेस, वेबसाईट्स इत्यादी ब्लॉक करण्यात आल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे अनुच्छेद 69 अ अनुसार केंद्र सरकारला असा अधिकार मिळाला आहे. 2014 पासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी अनुक्रमे 471, 500, 633, 1,385 2799, 3,635, 6,118 आणि 6,935 ब्लॉकिंग आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही राज्यसभेत देण्यात आली.