भाजप नेत्यांची पत्रकार परिषदेत घोषणा : जीवे मारण्याची धमकी देणाऱया हल्लेखोरांवर कडक कारवाई करा : हिंदू संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुका भाजपचे युवा नेते तसेच कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते पंडित ओगले यांना जीवे मारण्याच्या उद्देशानेच बुधवारी मध्यरात्रीनंतर काही समाजकंटकांनी त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी पंडित ओगले घरात नव्हते. ते घरात नसल्याचे ओगले यांच्या मातोश्री व पत्नीने त्यांना सांगितले. त्यावेळी पंडित याला आम्ही जीवे मारु, असे धमकावले. हे अत्यंत गंभीर कृत्य असून यामध्ये कुणाचा हात आहे. आणि ते हल्लेखोर कोण, याची गांभीर्याने चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हा पोलीस प्रमुखांसह गृहमंत्री आरगेंद्र ज्ञानेंद्र यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याची माहिती खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल यांनी शुक्रवारी खानापूर येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना पंडित ओगले म्हणाले, खानापुरातील साविओ परेरा यांच्या लग्नावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या विरोधामुळे माझ्यावर एकप्रकारचा राग आहे. या रागातून महिन्यापूर्वी त्यांनी मला व माझ्या कुटुंबीयांना काही ठिकाणी अपशब्द वापरले होते. हे प्रकरण मिटवण्यासाठी एका स्थानिक नेत्याने भाग घेतला होता. या नेत्याला ते प्रकरण मिटवता आले नाही. उलट परेरा यांनीच माझ्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केली. दुसरीकडे आपले सहकारी रफिक हुनशेनहट्टी टिप्पू सुलतानगर, अक्रम डंबलकर, वजेश शिंदे यांना मला मारण्यासाठी रात्री घराकडे पाठविले. त्यांच्यापासून आता माझ्या जीवाला धोका आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या चौघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी करावी व कडक शासन करावे, अशी आपली मागणी असल्याचे पंडित ओगले यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत सदानंद पाटील, सुरेश देसाई, धनश्री सरदेसाई, किरण यळगुकर, जॉर्डन गोन्साल्विस, राजू रायका यांनीही आपले मत प्रदर्शित करून त्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
पोलिसांकडून गुन्हय़ाची नोंद
पंडित ओगले यांनी खानापूर पोलीस स्थानकात दाखल केलेल्या फिर्यादीवरून साविओ परेरा, रफिक हुंचेनहट्टी, अक्रम डंबलकर व वजेश शिंदे यांच्याविरुद्ध 76/22, 452, 304, 506/1, आर-डब्ल्यू 34 आयपीसी कलमाखाली गुन्हा नोंद करून घेतला आहे. या प्रकरणी वजेश शिंदे याला ताब्यात घेतले आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पंडित ओगले यांना संपवण्याचा डाव…
या प्रकरणी खानापूर शहरातील हिंदू संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार प्रवीण जैन यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, साविओ परेरा यांनी आपल्या तीन सहकाऱयांना रात्री घराकडे पाठवून पंडित ओगले यांना संपवण्याचा डाव रचला. पण नशिबाने पंडित ओगले त्या ठिकाणी नव्हते. त्यांनी पाठवलेल्या सहकाऱयांमध्ये रफिक हुंचेनहट्टी, अक्रम डंबलकर व वजेश शिंदे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर पोलिसांकरवी कडक कारवाई करावी, तसेच त्यांच्यामुळे पंडित ओगले यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार प्रवीण जैन यांनी निवेदनाचा स्वीकार करून कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना सूचना करण्याचे आश्वासन दिले.