ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी देण्यात आली. रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका कार्यकर्त्याने ही धमकी दिली आहे.
रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांनी राजापुरात नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका मांडत असताना रिफायनरी विरोधकांचा संताप अनावर झाला. त्यावेळी रिफायनरी विरोधक जोशी नावाच्या कार्यकर्त्याने नाना पटोले आणि स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिली. जोशी नावाचा तो कार्यकर्ता म्हणाला, आम्ही आतंकवादी नाही, आम्ही सुद्धा मुंबईला असतो. कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही. कोणीही कंपन्या उघडून टाकतो. आमच्या जागा, आमचे गाव आहे. उद्या आम्ही काही खपवून घेणार नाही. आमची जागा आम्हाला पाहिजे, पंचक्रोशी आम्हाला पाहिजे, जर कुणी आमच्या पंचक्रोशीत पाय तोडून हातात देऊ. त्या उदय सामंतला जाळून टाकू आम्ही. या आंदोलनावर जर गोळीबार झाला तर याची पहिली गोळी, हा अप्पा जोशी घेईल, असेही तो यावेळी म्हणाला.
दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी उदय सामंत यांच्यासोबत चर्चा केली आहे. याबाबत अधिक चौकशी केली जात आहे.