साळ येथील सासरा व सुनेवर अंतिमसंस्कार. मेणकुरे येथील एकाचा बुधवारी अपघाती मृत्यू. अपघातातील दोघेजण इस्पितळातच.
डिचोली. प्रतिनिधी
2023 वर्ष सुरू झाल्यापासून अपघातांची व त्यामध्ये मृत्यू होण्याची मालिका सुरूच आहे. डिचोली मतदारसंघातील नानोडा येथे गुरू. दि. 9 फेब्रु. रोजी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांना मरण आले. तर सोम. दि. 6 रोजी रात्री मेणकुरे येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा बुध. दि. 8 रोजी संध्याकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांतच तीन अपघाती मृत्यूची नोंद डिचोलीत झाली.
दरम्यान नानोडा येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या वरचावाडा साळ येथील सासरे महादेव सावळाराम राऊत (वय 67) व सून सोनाली दिपक राऊत (वय 32) यांच्या पार्थिवावर काल शुक्र. दि. 10 फेब्र. रोजी दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कास मुर्डा बांदा सिंधुदुर्ग येथील मयत सोनाली यांची आई शुभदा नारायण रेडकर (65) व कारचा चालक मधलावाडा साळ येथील आशिष अनंत परब यांच्यावर बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.
मेणकुरे येथील अपघातात सतीश शेट्यो यांचे निधन
सोम. दि. 6 फेब्रु. रोजी रात्री शेट्योवाडा मेणकुरे येथे आपल्या घरी जाताना दुचाकीवरून ताबा सुटून पडलेल्या सतीश सदा शेट्यो (वय 45) यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. त्यांना तत्काळ बांबोळी येथे गोमेकॉत उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना बुध. दि. 8 फेब्रु. रोजी त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या पार्थिवावर गुरू. दि. 9 रोजी अंतिमसंस्कार करण्यात आले होते.
9 रोजीच नानोडा येथे भीषण अपघात
8 रोजीच्या अपघाती मृत्यूच्या घटनेनंतर दुस्रयाच दिवशी म्हणजे गुरू. दि. 9 फेब्रु. रोजी सकाळी 10.30 वा. नानोडा येथे पुजा गेस्ट हाऊसजवळ कदंब बस व अल्टो कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात वरचावाडा साळ येथील महादेव सावळाराम राऊत यांचे डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल होण्यापूर्वीच निधन झाले. तर त्यांची सून सोनाली राऊत यांचे डिचोली इस्पितळात निधन झाले. या अपघातातील अन्य दोन जखमींना बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले.
मृतांवर साळ येथे शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार.
वरचावाडा साळ येथे एकाच घरातील दोन व्यक्तींच्या निधनामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला होता. काल शुक्र. दि. 10 रोजी सकाळी महादेव राऊत व सोनाली राऊत यांचे मृतदेह साळ येथील त्यांच्या घरात आणण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गाव लोटला होता. माजी सभापती राजेश पाटणेकर, माजी आमदार नरेश सावळ, माजी जि. पंचायत सदस्य संजय शेट्यो, स्थानिक पंचसदस्य, लोकप्रतिनिधी यांनी त्यांचे अंतीम दर्शन घेतले. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवांवर स्थानिक स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात आले.
इस्पितळात जाताना घडला अपघात
उपलब्ध माहितीनुसार सोनालीची आई शुभदा रेडकर यांच्या डोळ्यावर काहीच दिवसांपूर्वी म्हापसातील एका इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या डोळ्यावर पट्टी होती ती काढून तपासणी करण्यासाठी हे सर्वजण म्हापसा येथे जात होते. अपघातात सापडलेली अल्टो कार हि महादेव राऊत यांचीच असून ती चालविण्यासाठी म्हणून आशिष परब याला सोबत घेतले होते. परंतु इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या कारला नानोडा येथे भीषण अपघात झाला. आणि त्यात दोघांवर काळाने थेट घालाच घातला. या घटनेमुळे नानोडा, साळसह डिचोली हादरले. अनेकांची मने हेलावली.